ज्युनियर द्रविडचं वडिलांच्या पावलावर पाऊल; दोन महिन्यात झळकावलं दुसरं द्विशतक

ज्युनियर द्रविडचं वडिलांच्या पावलावर पाऊल; दोन महिन्यात झळकावलं दुसरं द्विशतक

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि त्याचा मुलगा समित द्रविड

क्रिकेट जगतात ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडचा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत क्रिकेटजगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने नुकतच बंगळुरुमध्ये त्याच्या ‘माल्या आदिती इंटरनॅशनल’ शाळेकडून (MAI) खेळताना द्विशतक झळकावले. १४ वर्षाखालील ‘बीटीआर शिल्ड अंडर-१४ गट १, डिव्हिजन २ स्पर्धेमध्ये १४४ चेंडूमध्ये नाबाद २११ धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये २४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. समित द्रविडच्या द्विशतकीय जोरावर ५० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ३८६ धावांचा डोंगर बीजीएस नॅशनल पब्लिक शाळेच्या संघासमोर उभा केला. धावांचा पाठलाग करताना बीजीएस नॅशनल पब्लिक शाळेला केवळ २५४ धावाच करता आल्या. माल्या आदिती इंटरनॅशनल शाळेने हा सामना १३२ धावांनी जिंकला.

समित द्रविडने डिसेंबर २०१८ मध्ये १४ वर्षाखालील विभागीय स्पर्धेत वाइस प्रेसिडेंट संघाकडून खेळताना २०१ धावांची खेळी केली होती. समित द्रविड गेल्या वर्षी उत्कृष्ट कामगिरीमुळे चर्चेत आला होता. आंतर-विभागीय स्पर्धेत दोन सामन्यांमध्ये तीन गडी बाद करत २९५ धावा कुटल्या होत्या. समित द्रविडची कामगिरी पाहता वडिलांच्या म्हणजेच राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल टाकत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राहुल द्रविडने १६ वर्षांच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये १३,२८८ धावा, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,८८९ धावा केल्या आहेत.

First Published on: February 19, 2020 2:44 PM
Exit mobile version