राज्यवर्धन: माजखोर क्रीडा संघटकांना धडा शिकवा, तरच भारताची कामगिरी उंचावेल!

राज्यवर्धन: माजखोर क्रीडा संघटकांना धडा  शिकवा, तरच भारताची कामगिरी उंचावेल!

जकार्ता येथे पार पडलेल्या एशियाड क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली नाही तर बरीच झाली, असेच म्हणावे लागेल… 125 प्लस कोटींच्या भारताला या स्पर्धेत पहिल्या पाचातही क्रमांक न मिळावा, ही काही देशासाठी अभिमानाने मान उंचावी, अशी बाब नाही. पदक तालिकेत चीन, जपान, दक्षिण कोरिया, इराण, इंडोनेशिया यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. याचा खेद आणि खंत विविध खेळांच्या संघटनांना नसली तरी क्रिकेट सोडून ऑलिम्पिक खेळांवर प्रेम करणार्‍या क्रीडाप्रेमींना नक्की आहे. म्हणूनच क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आता विविध खेळांच्या माजखोर क्रीडा संघटकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. अन्यथा 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दोन चार सोडाच एकही सुवर्णपदक हाती लागणार नाही !

माजखोर क्रीडा संघटकांमध्ये सर्वात वरचा क्रमांक हा कबड्डीचा लागतो. हा खेळ अटकेपार नेला तो कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनी. महाराष्ट्राने लावलेला कबड्डीचा वेलू गगनावर गेला तेव्हा बुवा यांच्या चेहर्‍यावरील आनंद मी बघितला आहे… कबड्डीचा श्वास घेऊन जन्माला आलेले बुवा सतत या खेळाचा विचार करत आणि त्यांचे कबड्डीप्रेम पाहून शरद पवार यांनी त्यांना नेहमी मदतीचा हात दिला. यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेल्या बुवांनी सरकारी, निमसरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अशा सर्व बाजूंच्या नोकर्‍या कबड्डी खेळाडूंना मिळवून दिल्या… ग्रामीण भागातील राजू भावसार, अशोक शिंदे, गणेश शेट्टी हे एअर इंडियाच्या सेवेत दाखल झाले तो क्षण कबड्डीचे विमान हवेत उडल्याचा आनंद देणारा होता… कबड्डीच्या प्रचार प्रसाराला हातभार लागावा यासाठी त्यांनी क्रीडा पत्रकारांना राज्यात, देशात आणि परदेशातही नेले. या खेळाप्रती लळा लावला…आज बुवा हयात नाहीत; पण त्यांनी अस्सल भारतीय मातीतील या खेळाचे छोटे रोपटे लावून त्याचा वटवृक्ष केल्याबद्दल क्रीडाप्रेमी आयुष्यभर त्यांचे ऋणी राहतील! एशियाड, जागतिक स्पर्धेनंतर कबड्डी आज ऑलिम्पिकच्या दारात उभी असताना जकार्ता येथे भारतीय पुरुष तसेच महिला संघांना सहन करावा लागलेला पराभव लाजिरवाणा आहे. इराणने आपल्या दोन्ही संघांना मातीत लोळवले! हे कधीना कधी होणार होते. ते आता झाले इतकेच आणि याचे कारण म्हणजे भारतीय कबड्डी संघटना आपल्या घरची मालमत्ता करून टाकलेल्या जनार्दन गेहलोत यांचा मस्तवालपणा नडला. बेफिकीर लालबुंद डोळे, सुजलेला चेहरा, बेधुंद वागणे आणि आपले कोणी वाकडे करू शकत नाही, अशी गर्विष्ठ वृत्ती यामुळे जणू काही कबड्डी, गेहेलोत यांच्या घरचे पाणी भरते, अशी लाज आणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वासरात लंगडी गाय शहाणीप्रमाणे भारत कबड्डीत जिंकत होता तोपर्यंत ही सारी हुकूमशाही खपवून गेली. पण, आता या सार्‍याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भारतीय संघात प्रवेश हवा असल्यास एक कोटी एवढी रक्कम द्यायची, असे आरोप आधीपासून आणि बंद दाराआडून होत होते. ते आता खुलेआम होत आहेत. बाई, बाटली आणि पैसा याचा वापर सुरू असताना सर्वजण शांतपणे पाहत आहेत. हे कमी म्हणून की काय कबड्डीची गेहेलोत यांनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकली आहे. बायको आणि मुलेही संघटनेवर आणली. क्रीडा संघटना या स्वायत्त असतात असे सांगून सरकार आपल्या कारभाराला अटकाव करू शकत नाही, अशी माजोरडी वृत्ती संघटकांमध्ये आली आहे. त्यांचा माज उतरवण्याची हीच वेळ आहे. कुस्तीतही फार चांगले चित्र नाही. उत्तर भारतातील संघटकांची कायम कुस्तीवर पकड राहिली आहे. परिणामी त्यांना भारतात कुस्तीचा प्रचार प्रसार करावा, असे कधी वाटत नाही. आपल्या हातात या खेळाची सूत्रे राहावी, या स्वार्थापोटी त्यांनी मोठी होऊ शकणारी भारतीय कुस्ती खुरटी केली. याचे साधे उदाहरण म्हणजे सुशील कुमार… सुशील हा गुणवान ऑलिंपिक पदक विजेता खेळाडू. या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव रोशन केले, याचा सर्वांना अभिमान आहे. मात्र देशात आणखी सुशील कुमार आहेत, याचा कधी मोठा विचार झाला नाही. महाराष्ट्रात नरसिंग यादव आणि राहुल आवारे असे जागतिक दर्जाचे खेळाडू असताना त्यांना ऑलिंपिक, जागतिक स्पर्धा असो की एशियाड नेहमीच डावलले जाते. लंडन ऑलिंपिक निवड चाचणीवेळी बनाव करून नरसिंग यादवला संघातून बाहेर काढण्याचा रचलेला डाव आणि राहुलला ठरवून संघाबाहेर बसवण्याचे कुटिल कारस्थान हे कुस्तीला लाज आणणारे आहे.

आमिर खानचा दंगल सिनेमा पाहून आपण भारावून जातो. फोगट बहिणींची कामगिरी पडद्यावर पाहून आपले काळीज भरून येते, पण भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा पराक्रम आपण विसरतो. आज महाराष्ट्रात असे अनेक गुणी खाशाबा जाधव आहेत, पण बंद पडत चाललेल्या तालमी, कुस्तीच्या आश्रयदात्यांची कमी होत चाललेली संख्या, शरद पवार यांचे दुर्लक्ष, अजित पवार यांची सुटलेली पकड आणि बाळासाहेब लांडगे यांनी गेली अनेक दशके अडवून धरलेली राज्य कुस्ती संघटनेची खुर्ची या सर्वांचा परिणाम होऊन कुस्ती महाराष्ट्रात शेवटच्या घटका मोजत आहे. राज्यातच कुस्तीला कोणी वाली उरला नाही तर देशात महाराष्ट्राच्या मल्लांना कोण विचारणार ? अशी परिस्थिती आहे.अ‍ॅथलेटिक्समध्ये जकार्तात भारताची कामगिरी ठिकठाक असली तरी ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धेत आपण मार खातो, हे चित्र कायम आहे. मिल्खासिंग, श्रीरामसिंग, पी.टी.उषा, शायनी अब्राहम, वलसम्मा, अश्विनी नचाप्पा, वंदना राव, वंदना शानबाग यांनी आशियाई आणि जागतिक स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जने उत्तम कामगिरी केली असली तरी अजून मैदानी खेळात ऑलिंपिक पदक भारताला मिळालेले नाही. सुरेश कलमाडी यांनी राष्ट्रकुल, युवा राष्ट्रकुल, पुणे मॅरेथॉन भरवून स्पर्धांचे मोठमोठे मांडव घातले. पण, या करोडो रुपयांच्या पैशांच्या खेळात खेळाडू कुठे तयार झाले? असा प्रश्न विचारणार्‍या वि. वि. करमरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकारला मारहाण करण्यापर्यंत कलमाडी समर्थकांची मजल गेली. हे या देशात क्रीडा संस्कृती का निर्माण होऊ शकत नाही, याचे लाजिरवाणे उदाहरण आहे. आजही या परिस्थितीत बदल झालेला नाही… माजखोर व्यवस्थेला तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत. अन्यथा तुमचा आवाज बंद केला जाईल, हेच सांगणारे हे हुकूमशाही चित्र आहे. आज कलमाडी यांचा आवाज क्षीण झाला आहे. त्याउपर राष्ट्रीय संघटनेत ललीतकुमार भानोत वर्षोनुवर्षे राष्ट्रीय अ‍ॅथलॅटिक्स संघटनेत जागा अडवून बसले आहेत. त्यांची हुकूमशाही जगजाहीर आहे, पण त्यांना कोणी हात लावू शकत नाही.

हॉकी, फुटबॉल आणि गेला बाजार कराटे, तायक्वांडोतही बजबजपुरी आहे. अधिकृत संघटनांच्या नावावर अनधिकृत कारभार सुरू आहे. कोणी कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही. आपली खुर्ची टिकली पाहिजे आणि आपली घरे भरली पाहिजेत, हाच यामागचा उघड हेतू आहे. मोठ्या स्पर्धा आल्या आणि त्यात भारताची कामगिरी घसरली का, क्रीडा संघटनांच्या मस्तवालपणाची चर्चा होते. पण काही दिवसांनंतर ते शांत होऊन मस्तवाल संघटक तसाच हम करेसो कायदा असा कारभार करायला मोकळे होतात… असाच मस्तवालपणा भारतीय क्रिकेट असोसिएशनमध्ये होता. पण, न्यायालयाने त्यांना सरळ केले. त्यांचा कोटी कोटी रुपयांचा बंद खेळ उघड करायला लावला. कोणाची एकाची मक्तेदारी चालणार नाही, हे दाखवून दिले. असाच इंगा आता आशियाई आणि ऑलिंपिक खेळांच्या संघटनांना दाखवण्याची वेळ आली आहे.
क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड हे ऑलिंपिक रौप्यविजेते नेमबाज खेळाडू आहेत. सैन्यदलातील राठोड यांनी खेळाबरोबर आणि संघटनांचा कारभार जवळून बघितला आहे. चांगले काय, वाईट काय याचा अंदाज या युवा क्रीडा मंत्र्यांना आहे. जकार्तात ते स्वतः भारतीय खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला पुढे तर होतेच, पण स्वतः ते पाणी आणि ज्युस ही आपल्या खेळाडूंना देत होते. हे क्रीडाप्रेम त्यांनी आता मस्तवाल क्रीडा संघटकांना सरळ करण्यासाठी उपयोगात आणावे. सरकारने ठरवले तर खूप चांगले काम होऊ शकते. कायदेशीर अडचणी येतीलही, पण त्याचा सामना करत माजखोर क्रीडा संघटकांना धडा शिकवावा लागेल. तरच भारताचे क्रीडा भविष्य उज्ज्वल होईल. खेलो इंडिया स्पर्धा सुरू करून राठोड यांनी देशातील युवा गुणवत्ता शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता क्रीडा संघटकांच्या साफसफाईची मोहीम हाती घ्यावी….!

First Published on: September 2, 2018 2:30 AM
Exit mobile version