रोहित शर्मा म्हणजे पुढचा धोनी – सुरेश रैना

रोहित शर्मा म्हणजे पुढचा धोनी – सुरेश रैना

रोहित शर्मा हा पुढचा महेंद्रसिंग धोनीच आहे, अशा शब्दांत सुरेश रैनाने भारताच्या उपकर्णधाराची स्तुती केली. धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले. तसेच कितीही दबाव असताना शांतपणे योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे धोनी हा ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जातो. याबाबतीत धोनी आणि रोहितमध्ये साम्य आहे, असे रैनाला वाटते. रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने विक्रमी चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

रोहित अप्रतिम कर्णधार

रोहित हा भारतीय क्रिकेट संघासाठी पुढचा धोनीच आहे. तो अप्रतिम कर्णधार आहे. तो खूप शांत आणि संयमी आहे. इतरांचे सल्ले ऐकतो. त्याच्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो स्वतः दमदार कामगिरी करत इतरांसमोर आदर्श ठेवतो. जेव्हा कर्णधार स्वतः चांगला खेळतो आणि त्याचवेळी इतर खेळाडूंना मान देतो, त्यावेळी ड्रेसिंग रुममधील वातावरण सर्वोत्तम असते. चांगला कर्णधार असण्यासाठी आवश्यक सर्व गुण रोहितमध्ये आहेत, असे रैना म्हणाला.

‘त्या’ दोघांत बरेच साम्य…

रोहित सर्व खेळाडूंना कर्णधार असल्याप्रमाणेच मान देतो. मी त्याच्या नेतृत्वात खेळलो आहे. आम्ही बांगलादेशमध्ये आशिया चषक स्पर्धा जिंकली होती. धोनीनंतर रोहितच सर्वोत्तम कर्णधार आहे असे मी म्हणीन. या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. कर्णधार म्हणून हे दोघेही इतर खेळाडूंचे ऐकतात, असे सुरेश रैनाने नमूद केले. रोहित कर्णधार असताना भारताने आतापर्यंत १० पैकी ८ एकदिवसीय सामने, तर २० पैकी १६ टी-२० सामने जिंकले आहेत.

First Published on: July 30, 2020 1:30 AM
Exit mobile version