खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट – रोहित

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट – रोहित

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. रोहित सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने मागील काही वर्षांत फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. मागील वर्षीच्या विश्वचषकात त्याने विक्रमी पाच शतके लगावली होती. त्यामुळेच बीसीसीआयने भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस केली. माझ्यासाठी ही फारच सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट आहे, असे रोहितने रविवारी सांगितले. याबाबतचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरुन शेअर केला.

बीसीसीआयने भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी माझी शिफारस ही माझ्यासाठी सन्मानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. मी बीसीसीआय, माझे भारतीय संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, चाहते आणि माझ्या कुटुंबीयांचा खूप आभारी आहे. ते नेहमीच मला पाठिंबा देतात. माझ्यासोबत उभे राहतात. सर्वांचेच खूप आभार, असे रोहित त्या व्हिडीओमध्ये म्हणाला. बीसीसीआयने रोहितची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करतानाच ईशांत शर्मा, शिखर धवन आणि दीप्ती शर्माच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे.

First Published on: June 1, 2020 5:10 AM
Exit mobile version