सॅफ फुटबॉल स्पर्धा

सॅफ फुटबॉल स्पर्धा

भारताला सलग पाचवे जेतेपद

भारताच्या संघाने नेपाळचा पराभव करत सलग पाचव्यांदा सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले आहे. भारताने या स्पर्धेचा अंतिम सामना ३-१ असा जिंकला. तसेच या विजयामुळे भारताने या स्पर्धेत सलग २३ सामने अपराजित राहण्याचा विक्रम सुरु ठेवला आहे. भारतासाठी दालीमा चिब्बर, ग्रेस डांगमे आणि अंजु तमंग यांनी गोल केले.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ग्रेस डांगमेने उजव्या बाजूने चांगला खेळ करत भारतासाठी गोल करण्याच्या काही संधी निर्माण केल्या. तर नेपाळच्या खेळाडूंनीही गोलवर काही फटके मारले. मात्र, भारताची गोलरक्षक अदिती चौहानने ते अडवले. या सामन्याच्या २६ व्या मिनिटाला भारताला फ्री-किक मिळाली. यावर दालीमा चिब्बरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर नेपाळने चांगले पुनरागमन केले. सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला साबित्राने गोल करत सामन्यात बरोबरी केली. पुढे दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि मध्यांतराला ही बरोबरी कायम राहिली.

मध्यांतरानंतर भारताने चांगला खेळ केला. याचा फायदा त्यांना ६३ व्या मिनिटाला मिळाला, जेव्हा संजूच्या अप्रतिम पासवर ग्रेस डांगमेने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताच्या भक्कम बचावामुळे नेपाळला गोल करता येत नव्हता. यानंतर अंजु तमंग सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला जोरदार फटका मारत गोल करून भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत राखत भारताने हा सामना आणि ही स्पर्धा जिंकली.

First Published on: March 23, 2019 4:59 AM
Exit mobile version