कसोटी संघात नसूनही सैनी टीम इंडियासोबत राहणार

कसोटी संघात नसूनही सैनी टीम इंडियासोबत राहणार

सैनी

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने आपल्या भेदक मार्‍याने आणि वेगाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या मालिकेच्या ३ सामन्यांत त्याने ५ बळी मिळवत संघ व्यवस्थापनावर छाप पाडली. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश नसतानाही सैनीला संघासोबतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास त्याला संधी मिळू शकेल.

याबाबतची माहिती देताना बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला, नवदीप सैनीला कसोटी मालिकेसाठी संघासोबत ठेवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. तो प्रामुख्याने नेट्समध्ये गोलंदाजी करेल. त्याने मागील काही वर्षांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो उत्तम वेगाने गोलंदाजी करतो, तसेच तो उसळी घेणारे चेंडूही सहजरित्या टाकू शकतो. भविष्यात तो भारतीय कसोटी संघाचा प्रमुख भाग होईल, अशी संघ व्यवस्थापनाला आशा आहे.

स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणार्‍या सैनीच्या नावे ४३ प्रथम श्रेणी सामन्यांत १२० विकेट्स आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळावे यासाठी सैनीला संघासोबत ठेवण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकार्‍याने सांगितले, अरुण यांनी वेगवान गोलंदाजांसोबत बरीच मेहनत घेतली आहे. त्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाले, तर सैनीचा खूप फायदा होईल. त्यामुळेच स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यापेक्षा सैनीने भारतीय संघासोबत रहावे, असा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे.

First Published on: August 20, 2019 5:26 AM
Exit mobile version