कसोटी क्रिकेटच्या प्रसिद्धीसाठी डे-नाईट टेस्ट उत्तम पर्याय!

कसोटी क्रिकेटच्या प्रसिद्धीसाठी डे-नाईट टेस्ट उत्तम पर्याय!

सौ - India Tv

आयपीएल, बिग बॅश लीग यासारख्या टी-२० स्पर्धांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू कमी होत आहे. टी-२० कडे प्रेक्षक आकर्षित होत आहेत. त्यामुळे जर कसोटी क्रिकेटकडे लोकांना वळवायचे असेल तर डे-नाईट कसोटी सामने हा उत्तम पर्याय आहे असे मत भारताचा माजी क्रिकेटर आणि समीक्षक संजय मांजरेकर याचे आहे.

डे-नाईट कसोटी सामने हा सर्वोत्तम पर्याय 

संजय मांजरेकर कसोटी क्रिकेटबाबत म्हणाला, “क्रिकेटची लोकप्रियता कमी होत आहे. त्यामुळे जर प्रेक्षकांना कसोटी क्रिकेटकडे वयवायचे असेल तर डे-नाईट कसोटी सामने हा सर्वोत्तम पर्याय आहे. अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणात डे-नाईट कसोटी सामने का खेळले जात नाहीत हे मला कळत नाही. भारताने तर अजून एकही डे-नाईट कसोटी सामना खेळलेला नाही.”

कसोटी क्रिकेट खूप कठीण

आयपीएल आणि कसोटी सामने यांची तुलना करताना मांजरेकर म्हणाला, “कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत तर दुसरीकडे आयपीएलच्या सामन्यांमध्ये पूर्ण स्टेडियम भरलेले असतात. आयपीएलमुळे खेळाडूंना ओळख मिळते, पैसा मिळतो. तर कसोटी क्रिकेट खूप कठीण असते. त्यामुळे आता बरेच खेळाडू टी-२० स्पर्धांवर लक्ष्य केंद्रित करत आहेत यात नवल नाही.”

भारतीय फलंदाजांचे खराब तंत्र

भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका ४-१ अशी गमावली होती. या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन केले. त्याबद्दल मांजरेकर म्हणाला, “भारताच्या निराशाजनक फलंदाजीला त्यांचे खराब तंत्र कारणीभूत होते. भारताच्या गोलंदाजांनी या मालिकेत खूप चांगले प्रदर्शन केले. पण फलंदाजांनी त्यांना चांगली साथ दिली नाही.”
First Published on: October 1, 2018 10:45 PM
Exit mobile version