सौरभ चौधरीला रौप्यपदक

सौरभ चौधरीला रौप्यपदक

सौरभ चौधरी

भारताचा प्रतिभावान नेमबाज सौरभ चौधरीने दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. विश्वचषक आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या १७ वर्षीय सौरभने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत २४४.५ गुणांसह या रौप्यपदकाची कमाई केली. उत्तर कोरियाच्या किम साँग गूकने २४६.५ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. इराणच्या जावेदने कांस्यपदक मिळवताना २२१.८ गुणांची नोंद केली.

त्याआधी झालेल्या पात्रता फेरीत सौरभ आणि अभिषेक वर्मा यांनी ५८३ गुण मिळवत अंतिम फेरी गाठली होती. पात्रता फेरीत सौरभ सातव्या, तर अभिषेक सहाव्या क्रमांकावर राहिला होता. आठ नेमबाजांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत अभिषेकला १८१.५ गुणच मिळवता आले. त्यामुळे त्याला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. या दोघांनी याआधीच्या स्पर्धांमध्येच दमदार कामगिरी करत पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.

अंगद, मायराजची ऑलिम्पिकमध्ये एंट्री

भारताचे नेमबाज अंगद बाजवा आणि मायराज अहमद खान यांनी आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या स्कीट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. या दमदार कामगिरीमुळे त्यांनी भारताला पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकचे नेमबाजीतील १४ आणि १५ वे स्थान मिळवून दिले आहे.

First Published on: November 12, 2019 5:47 AM
Exit mobile version