महाराष्ट्र पोलीस, शिवशक्तीला जेतेपद

महाराष्ट्र पोलीस, शिवशक्तीला जेतेपद

विशेष व्यावसायिक गटात महाराष्ट्र पोलीस संघाने, तर महिला गटात शिवशक्ती संघाने शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. व्यावसायिक प्रथम श्रेणी गटात सेंट्रल जी.एस.टी आणि इनकमटॅक्स संघाने, तसेच महाविद्यालयीन गटात वंदे मातरमने अजिंक्यपद मिळवले.

महाराष्ट्र पोलीस आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यातील विशेष व्यावसायिक गटाचा अंतिम सामना सुरुवातीला चुरशीचा झाला. त्यामुळे मध्यंतराला महाराष्ट्र पोलीस संघाकडे ११-१० अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. मध्यंतरानंतर महिंद्रा अँड महिंद्राला चांगला खेळ करता आला नाही, तर महाराष्ट्र पोलीस संघाने उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे त्यांनी हा सामना ३२-१७ असा मोठ्या फरकाने जिंकला. महाराष्ट्र पोलीस संघाच्या विजयात बिपिन थले व महेंद्र राजपूत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महिला गटात शिवशक्ती संघाने आपले वर्चस्व कायम ठेवत अमर हिंद मंडळावर अंतिम फेरीत ३२-२२ असा विजय मिळवला. शिवशक्ती संघाकडून रेखा सावंत, अपेक्षा टाकले व पूजा यादव यांनी उत्कृष्ट खेळ केला. व्यावसायिक प्रथम श्रेणीत सेंट्रल जी.एस.टी आणि इन्कम टॅक्स संघाने टी.बी.एम स्पोर्ट्सचा २८-१९ असा पराभव करत जेतेपद पटकावले. महाविद्यालयीन गटाच्या अंतिम सामन्यात वंदे मातरम डोंबिवली संघाने ठाकूर कॉलेजवर ४४-३९ असा विजय मिळवला. या सामन्याच्या मध्यंतरापर्यंत ठाकूर कॉलेजकडे १९-१० अशी आघाडी होती.

विशेष व्यावसायिक गटात सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र पोलिसच्या बिपिन थलेला गौरवण्यात आले. महिला गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार शिवशक्तीच्या पूजा यादवला मिळाला. व्यावसायिक प्रथम श्रेणी गटात आयकर संघाचा भागेश भिसे आणि महाविद्यालयीन गटात वंदे मातरमचा धीरज तरे सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला.

First Published on: October 11, 2019 5:14 AM
Exit mobile version