पाकिस्तानमध्ये क्रीडा क्षेत्राला अवकळा – तौकीर दार, पाकिस्तान हॉकी प्रशिक्षक

पाकिस्तानमध्ये क्रीडा क्षेत्राला अवकळा – तौकीर दार, पाकिस्तान हॉकी प्रशिक्षक

तौकीर दार, पाकिस्तान हॉकी प्रशिक्षक

हॉकी, स्क्वॉशसारख्या खेळात एकेकाळी अव्वल स्थानी असलेल्या पाकिस्तानच्या क्रीडा क्षेत्राला अवकळा आल्याची टीका पाकिस्तानचे प्रशिक्षक तौकीर दार यांनी केली. क्रिकेट वगळता इतर खेळांत पाकिस्तानची पीछेहाट झाली असून क्रीडाक्षेत्रात मरगळ आल्याचे त्यांनी नमूद केले.

बेल्जियमविरुद्ध खेळाडूंनी अक्षम्य चुका केल्या

वर्ल्ड हॉकी स्पर्धेत पाकिस्तानने सर्वाधिक ४ जेतेपदे पटकावली आहेत. मात्र, त्याच पाकिस्तानला या वर्ल्ड कपची उपांत्यपूर्व फेरीदेखील गाठता आली नाही. हॉलंडकडून साखळी लढतीत तर बेल्जियमकडून क्रॉसओव्हर लढतीत पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले. आमच्या खेळाडूंनी अक्षम्य चुका केल्या. आमच्या आक्रमणात दम नव्हता त्यामुळे बचाव फळीवर दडपण आले आणि आमची पूरती दमछाक झाली. कर्णधार रिझवान मोहम्मद दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला. वर्ल्ड कपसाठी कर्णधारपद मिळालेल्या अहमद बटने बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात चूक केली आणि त्याला मैदानाबाहेर जावे लागले.

पाकिस्तानातील परिस्थिती खेळांसाठी प्रतिकूल  

जागतिक हॉकीला वर्ल्ड कप ही पाकिस्तानचीच देणगी. पण सध्या पाकिस्तानात हॉकीची परवड सुरु आहे. खेळाडूंना नोकऱ्या नाहीत आणि देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा खालावला आहे. जागतिक हॉकी स्पर्धेत टिकण्यासाठी चांगली उच्च दर्जाची हॉकी खेळायला हवी. पण सध्यातरी पाकिस्तानातील परिस्थिती, वातावरण हॉकीच नाही तर खेळांसाठी प्रतिकूल आहे. अपवाद फक्त क्रिकेटचा ! असे उद्गार दार यांनी काढले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तर नामवंत क्रिकेटपटू. त्यांच्या राजवटीत खेळांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा दार यांनी व्यक्त केली.

बेल्जियम, हॉलंडचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 
बेल्जियम आणि हॉलंडने वर्ल्ड कप हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेल्जियमने क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानचा तर हॉलंडने कॅनडाचा ५-० असा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा जर्मनीशी आणि हॉलंडचा यजमान भारताशी सामना होईल.

– शरद कद्रेकर 
First Published on: December 12, 2018 3:00 AM
Exit mobile version