PAK vs BAN : बांगलादेशची कडवी झुंज; पाकला १२८ धावा काढताना फुटला घाम

PAK vs BAN : बांगलादेशची कडवी झुंज; पाकला १२८ धावा काढताना फुटला घाम

टी-२० विश्वचषकात शानदार प्रदर्शन केलेल्या पाकिस्तानचा संघ सध्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. शुक्रवारी ढाका येथे पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये या संघामध्ये पहिला टी-२० सामना पार पडला. पहिल्या सामन्यात बांगलादेशने कडवी झुंज दिली. पाकिस्तानला सामन्यात विजय मिळवण्यात यश आले पण बांगलादेशने दिलेले अवघ्या १२८ धावांचे आव्हान गाठताना पाकिस्तानी फलंदाजांना चांगलाच घाम फुटला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर पाकिस्तानने विजय मिळवला. बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकचे फलंदाज चितपट झाल्याचे पहायला मिळाले. पाकिस्तानने पहिल्या ६ षटकांतच केवळ २९ धावांवर आपले ४ फलंदाज गमावले होते.

मात्र शेवटच्या काही षटकांत शादाब खान आणि मोहम्मद नवाजने सावध खेळी करून संघाला निसटता विजय मिळवून दिला. शादाबने १० चेंडूत २१ तर नवाजने ८ चेंडूत १८ धावा करून पहिला सामना पाकच्या नावावर केला. तर पाकिस्तानचे प्रमुख फलंदाज पूर्णत: अपयशी ठरले. विश्वचषकात शानदार खेळी करणारे खेळाडू बांगलादेशच्या आक्रमक माऱ्याचा सामना करू शकले नाहीत. संघाकडून मोहम्मद रिझवान, कर्णधार बाबर आझम आणि शोएब मलिक यांना साजेशीही खेळी करता आली नाही. ढाकामध्ये झालेल्या या सामन्यात रिझवानने ११, बाबर आझमने ७ धावा केल्या. तर शोएब मलिक आणि हैदर अलीला आपले खातेही उघडता आले नाही.

पहिल्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाला फक्त १२७ एवढी धावसंख्या करता आली. बांगलादेशच्या डावाची सुरूवात देखील पाकिस्तानसारखी खराब झाली होती. बांगलादेशचे पहिले तीन फलंदाज १, १ आणि ७ धावसंख्या करून बाद झाले. लक्षणीय बाब म्हणजे सध्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेत बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसन संघाचा भाग नसणार आहे.


हे ही वाचा: Ab de Villiers Retiremen : एबी डिव्हिलियर्सच्या राजीनामा, अन् कोहली झाला भावूक


 

First Published on: November 19, 2021 7:19 PM
Exit mobile version