IPL 2022: भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूला सहभागी करा, गावस्करांचा BCCIला सल्ला

IPL 2022: भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूला सहभागी करा, गावस्करांचा BCCIला सल्ला

भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्ध पाच विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजाबाबत बीसीसीआयला सल्ला दिला आहे. वेगवान गोलंदाज उमरान मलिकला आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात सहभागी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबादचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज उमरानने काल बुधवारी रात्री अप्रतिम गोलंदाजी करत २५ धावा देत पाच बळी घेतले.

गावस्करांनी बीसीसीआयला दिला सल्ला

उमरान मलिकची कामगिरी मात्र संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही. कारण राशिद खान आणि राहुल तेवतिया यांनी शेवटच्या चार ओव्हर्समध्ये ५६ धावा देत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. गुजरात संघाने शेवटच्या ६ चेंडूत २२ धावा केल्या. भारताचे माजी कर्णधार गावस्कर सामन्यानंतर समालोचन करताना म्हणाले की, त्याच्यापुढील आव्हान भारतीय संघाचे आहे. भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव असल्यामुळे त्याला शेवटच्या ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे कदाचित तो खेळू शकणार नाही.

संघात सहभागी करणं महत्त्वाचं

गावस्कर म्हणाले की, फक्त संघासोबत प्रवास करणे, रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या खेळाडूंसोबत प्रवास करणे, त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे, त्याचा त्याच्यावर कसा परिणाम होतो ते पाहूया… या युवा वेगवान गोलंदाजाने संपूर्ण हंगामात नियमितपणे १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे आणि ८ सामन्यांमध्ये १५.९३ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतले आहेत.

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला जूनमध्ये सुरूवात होणार आहे. कोविड-१९ मुळे गेल्या वर्षी रद्द झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटीत दोन्ही संघ प्रथम खेळणार आहेत. यानंतर तीन सामन्यांची T20 मालिका आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.


हेही वाचा : IPL 2022: भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात या खेळाडूला सहभागी करा, गावस्करांचा BCCIला सल्ला


 

First Published on: April 28, 2022 4:29 PM
Exit mobile version