T20 WC ENG VS NZ Semifinal : फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी न्यूझीलंडला १६७ धावांचे लक्ष्य

T20 WC ENG VS NZ Semifinal : फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी न्यूझीलंडला १६७ धावांचे लक्ष्य

सध्या सुरू असलेला टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना दोन्हीही संघासाठी करो या मरो असा आहे. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला विश्वचषकाच्या फायनलचे तिकिट मिळेल. त्याच अनुषंगाने इंग्लंडने पहिल्या डावात साजेशी खेळी करत न्यूझीलंडला विजयासाठी १६७ धावांचे आव्हान दिले आहे. मोईन अलीच्या नाबाद अर्धशतकीय खेळीच्या बदल्यात इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १६६ धावा केल्या. इंग्लंडकडून सुरुवातीपासून धिम्या गतीने धावसंख्या झाली. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो अवघ्या १३ धावा करून स्वस्तात परतला. संघाकडून मोईन अलीने सर्वाधिक नाबाद ३७ चेंडूत ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

तत्पुर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून विश्वविजेत्या इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीपासूनच डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पकड बनवून ठेवली. इंग्लंडचा पहिला बळी घेण्यात अॅडम मिलनेला यश आले. इंग्लंडचा पहिला बळी संघाची धावसंख्या अवघी ३७ असताना जॉनी बेयरस्टोच्या रुपात गेला. तर इश सोधीने जोस बटलरला त्याच्या २९ धावा असताना माघारी पाठवले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सांघिक खेळी करत विश्वविजेत्या इंग्लंडला २० षटकांत १६६ धावांवर रोखले.

न्यूझीलंडकडून टिम साउदी, अॅडम मिलने, इश सोधी आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत पहिल्या डावात पकड मिळवली. इंग्लंडकडून मोईन अली (५१), डेविड मलान (४१), जोस बटलर (२९), यांनी प्रत्येकी सावध खेळी करत धावा जोडल्या.

दोन्हीही संघानी चालू विश्वचषकात ५ सामन्यांमध्ये प्रत्येकी ४-४ सामन्यावर विजय मिळवला आहे. आजचा सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्हीही संघ प्रयत्नशील असतील. मात्र आज जो संघ पराभूत होईल त्याचे पराभवासह विश्वचषकातील आव्हान देखील संपुष्टात येईल.


हे ही वाचा :IND VS NZ : KKR कडून १६०० धावा केल्या, पण निवड समितीने नाकारले; हरभजन सिंगचा संताप


 

First Published on: November 10, 2021 9:29 PM
Exit mobile version