टीम इंडियात पडलेत दोन गट?

टीम इंडियात पडलेत दोन गट?

रोहित शर्मा,विराट कोहली

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारतीय संघाचा न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचे तिसर्‍यांदा विश्वविजेते होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. इंग्लंडमध्ये होत असलेला हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, त्यांना या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले आणि यामागची कारणे शोधण्याचा आता प्रयत्न सुरु झाला आहे.

भारतीय संघात दोन वेगवेगळे गट असल्याने ते या विश्वचषकात सर्वोत्तम खेळ करू शकले नाही, अशी माहिती समोर आली आहे. तसेच भारताच्या संघातील काही खेळाडू कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली. ९ पैकी ७ सामने जिंकत त्यांनी गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, उपांत्य फेरीत त्यांना चांगला खेळ करण्यात अपयश आले. भारताच्या या पराभवाला कोहली-शास्त्री जोडीला जबाबदार धरले जात आहे. हे दोघे संघातील इतर सदस्यांशी चर्चा न करताच निर्णय घेत असल्याने आणि घेतलेले निर्णय संघावर लादतात असल्याने काही खेळाडू कर्णधार-प्रशिक्षकावर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

त्याचप्रमाणे कोहली आपल्या आवडत्या खेळाडूंना (चांगली कामगिरी होत नसेल तरीही) इतरांपेक्षा जास्त संधी देत असल्याने या संघात दोन गट पडले आहेत, ज्यातील एक गट कोहलीशी पटत असलेल्या खेळाडूंचा आणि दुसरा गट रोहित शर्माशी पटत असलेल्या खेळाडूंचा आहे, अशी माहिती समोर येत आहे.

First Published on: July 14, 2019 4:39 AM
Exit mobile version