कांगारूं विरुद्धचा पराभव भारतासाठी ठरेल फायदेशीर

कांगारूं विरुद्धचा पराभव भारतासाठी ठरेल फायदेशीर

Rahul dravid

इंग्लंडमध्ये मे महिन्यापासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारताचे आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीत. विश्वचषकाआधीची भारताची अखेरची एकदिवसीय मालिका काही दिवसांपूर्वीच झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या मालिकेत भारताचा 3-2 असा पराभव झाला. या मालिकेतील पहिले 2 सामने भारताने जिंकले होते. मात्र, त्यानंतर भारताला चांगले प्रदर्शन करता आले नाही आणि त्यांनी ही मालिका गमावली. विश्वचषकाआधीचा हा पराभव भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये जाऊन आपण (भारत) अगदी सहज विश्वचषक जिंकू, असा काहींचा समज झाला होता, पण (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) हा पराभव झाला ते भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल. या पराभवामुळे भारतीय खेळाडूंना आता हे कळले असेल की विश्वचषकात आपल्याला खूप चांगले खेळावे लागेल, असे द्रविडने सांगितले. तसेच तो पुढे म्हणाला, भारताने मागच्या दोन वर्षांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. आपण जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याने आणि दमदार कामगिरीमुळेच भारत विश्वचषक सहजपणे जिंकेल, असे काहींना वाटत होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला. मात्र, या पराभवानंतरही मला वाटते की हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारत दावेदार आहे, पण विश्वचषक जिंकणे कोणत्याही संघाला सोपे जाणार नाही. या विश्वचषकात सर्व संघांमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळेल.

विश्वचषकाआधी भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. विश्वचषकाआधी 23 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएलमध्ये खेळाडूंना दुखापत होऊ शकेल आणि त्यांची फिटनेस खालावू शकेल, अशी भीती असल्याने खेळाडूंनी आयपीएलच्या काही सामन्यांत विश्रांती घ्यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत द्रविड म्हणाला, प्रत्येक खेळाडू याबाबतीत हुशार झाला आहे. त्यांना स्वत:च्या शरीराची काळजी कशी घ्यायची हे माहिती आहे. विश्रांती घेतल्यानंतर खेळण्यापेक्षा सातत्याने क्रिकेट खेळत असतानाच माझ्या शरीराला चांगले वाटते, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सांगितल्याचे मी वाचले. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी गोष्टी वेगळ्या असतात. सगळ्यांना एकच नियम लागू होऊ शकत नाही. आपल्याला खेळाडूंवरच विश्वास दाखवावा लागेल.

First Published on: March 22, 2019 4:31 AM
Exit mobile version