पावसाचे काहीतरी करा रे!

पावसाचे काहीतरी करा रे!

Virat Kohli

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. ९० मिनिटे उशिराने सुरू झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा सामना ४३ षटकांचा करण्यात आला. पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे आणखी ९ षटके कमी केल्याने सामना ३४ षटकांचा झाला. मात्र, पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या डावात केवळ १३ षटके झाल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला. त्यावेळी वेस्ट इंडिजची १ बाद ५४ अशी धावसंख्या होती. पावसामुळे हा सामना न होऊ शकल्याने भारताचा कर्णधार विराट कोहली निराश झाला.

सामना सुरू असताना पाऊस पडल्यामुळे सामना रद्द होणे, ही क्रिकेटमधील सर्वात वाईट गोष्ट आहे. पावसामुळे सतत सामना थांबणे, पुन्हा सुरू होणे, पुन्हा थांबणे यामुळे खेळाची मजा निघून जाते. एक तर इतका पाऊस पडला पाहिजे की सामना सुरूच होऊ शकणार नाही किंवा सामना सुरळीत झाला पाहिजे. पावसामुळे जितके वेळा सामना थांबतो, तितकी खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे पंचांना खूप काळजी घ्यावी लागते, असे सामन्यानंतर कोहली म्हणाला.
तसेच वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याबाबत विचारले असता कोहलीने सांगितले, काही खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना जास्त उसळी मिळते, तर काही खेळपट्ट्या खूप संथ आणि फलंदाजीसाठी अवघड असतात. त्यामुळे तुम्हाला त्यांचा योग्य अंदाज घेऊन खेळावे लागते.

First Published on: August 10, 2019 1:20 AM
Exit mobile version