बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथी कसोटी होणार संस्मरणीय! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नाणेफेक?

बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथी कसोटी होणार संस्मरणीय! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नाणेफेक?

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशांचे पंतप्रधान उपस्थित राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्याची नाणेफेक करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा सामना चाहत्यांसाठी आणि दोन्ही संघातील खेळाडूंसाठीही संस्मरणीय ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचा हा अधिकृत दौरा आहे. या दौऱ्यात ते उद्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यासाठी मोटेरा येथील ​पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचणार आहेत. पंतप्रधान मोदी हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील, अशी चर्चा असतानाच आता ते कर्णधार रोहित शर्मा आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यासोबत नाणेफेक करताना दिसतील, असेही सांगितले जात आहे. मात्र या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

भारतीय संघाने २०२१ पासून मोटेराच्या मैदानावर खेळले गेलेले दोन्ही कसोटी सामने जिंकले आहेत. त्यामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममधील चौथी कसोटी भारतासाठी शेवटची संधी आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

प्रेक्षकसंख्येचा विक्रम भारताच्या नावे करण्याची संधी
अहमदाबादमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला एक ऐतिहासिक विक्रम करण्याची संधी आहे. कसोटी क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी एका दिवशी सर्वाधिक प्रेक्षक येण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा विक्रम झाला आहे. मेलबर्नच्या मैदानावर २०१३-१४ साली झालेल्या एका सामन्यात एका दिवशी ९१,११२ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. हा विक्रम गुरुवारी मोडला जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख ३२ हजार इतकी आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी या उपस्थित असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

First Published on: March 8, 2023 9:02 PM
Exit mobile version