बुमराहची सरावाला सुरुवात!

बुमराहची सरावाला सुरुवात!

Jasprit Bumrah

पाठीच्या दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागील काही काळ मैदानाबाहेर रहावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये त्याला ही दुखापत झाली. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकांना मुकावे लागले. तसेच तो आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्येही खेळू शकणार नाही. मात्र, आता त्याने आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सचे ट्रेनर रजनीकांत शिवगननं यांच्या मार्गदर्शनात मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो.

२५ वर्षीय बुमराह पुढील वर्षी न्यूझीलंड दौर्‍यामध्ये भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. भारताचा संघ या दौर्‍यात पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौर्‍याची सुरुवात टी-२० मालिकेपासून होणार असून या मालिकेतील पहिला सामना २४ जानेवारीला होईल.

रजनीकांत शिवगननं हे आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे ट्रेनर म्हणून काम करतात. मात्र, आयपीएल स्पर्धा सुरु नसताना ते इतर खेळाडूंना मार्गदर्शन करतात. बुमराहने सोमवारी शिवगननं यांच्यासोबत सराव करतानाचा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. शिवगननं यांनी यावर्षी ऑगस्टमध्ये भारतीय संघाच्या ट्रेनरपदासाठी अर्ज केला होता, पण या पदी न्यूझीलंडच्या निक वेबची निवड झाली.

बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स पटकावणार्‍या वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराहचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच १२ कसोटी सामन्यांत त्याच्या नावे ६२ विकेट्स आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकचीही नोंद केली होती. त्यामुळे तो लवकरच संघात पुनरागमन करेल, अशी भारतीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला आशा आहे.

First Published on: December 4, 2019 2:11 AM
Exit mobile version