मँचेस्टर सिटीची विक्रमी कामगिरी

मँचेस्टर सिटीची विक्रमी कामगिरी

इंग्लंडमधील तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा पहिला संघ

वॉटफोर्डचा अंतिम सामन्यात ६-० असा धुव्वा उडवत मँचेस्टर सिटीने इंग्लिश फुटबॉल स्पर्धा एफए कपचे जेतेपद पटकावले. मँचेस्टर सिटीने या मोसमात एफए कपसह प्रीमियर लीग आणि कारबाओ कप (लीग कप) या इंग्लंडमधील दोन प्रमुख स्पर्धाही जिंकल्या. या तिन्ही स्पर्धा एकाच मोसमात जिंकणारा मँचेस्टर सिटी हा इंग्लिश फुटबॉल इतिहासातील पहिला संघ आहे.

एफए कपच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच मँचेस्टर सिटीने वॉटफोर्डवर वर्चस्व प्रस्थापित केले. २६व्या मिनिटाला डेविड सिल्वा आणि ३८व्या मिनिटाला गॅब्रियल जेसूसने केलेल्या गोलमुळे या सामन्याच्या मध्यंतराला सिटीकडे २-० अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर त्यांनी अधिकच आक्रमक खेळ केला.

केविन डी ब्रून (६१ वे मिनिट), जेसूस (६८) आणि रहीम स्टर्लिंगने २ गोल (८१ आणि ८७) मारल्यामुळे मँचेस्टर सिटीने हा सामना ६-० असा जिंकला. या पराभवामुळे वॉटफोर्डचा जेतेपदाचा दुष्काळ अजूनही कायम आहे, तर सिटीने काही दिवसांपूर्वीच लिव्हरपूलला मागे टाकत प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकली होती.

First Published on: May 20, 2019 4:29 AM
Exit mobile version