‘हा’ केवळ तात्पुरता पर्याय!

‘हा’ केवळ तात्पुरता पर्याय!

अनिल कुंबळे

करोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, हा केवळ तात्पुरता पर्याय असून करोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर क्रिकेटही पूर्ववत होईल, असे मत आयसीसीच्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेने व्यक्त केले. कुंबळेच्या समितीने खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी चेंडू चमकवण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. शुक्रवारी आयसीसीने पुन्हा क्रिकेट सुरू करण्यासाठी आपली मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. यात ही कृती करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी हा केवळ तात्पुरता पर्याय आहे. पुढील काही महिन्यांत किंवा एखाद वर्षात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर क्रिकेटही पूर्ववत होईल. गोलंदाज तेव्हा बहुदा पुन्हा थुंकीचा वापर करु शकतील, असे कुंबळे म्हणाला. थुंकीच्या बंदीबाबत गोलंदाजांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काहींच्या मते चेंडूला तकाकी आणल्याशिवाय तो स्विंग करणे अवघड होणार आहे आणि गोलंदाजांचे काम अधिक आव्हानात्मक होणार आहे. तर सर्वांचा जीव महत्त्वाचा असल्याने बरेच जण या बंदीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयसीसी थुंकीऐवजी मेणासारख्या इतर कृत्रिम पदार्थांचा वापर करण्याला परवानगी देऊ शकेल अशी चर्चा आहे. मात्र, यावर चर्चा सुरू असून अजून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही असे कुंबळेने स्पष्ट केले. आम्ही याबाबत चर्चा करत आहोत. तुम्ही जर क्रिकेटचा इतिहास पाहिलात, तर तुम्हाला लक्षात येईल की कोणताही कृत्रिम पदार्थ वापरण्यासाठी परवानगी दिली जात नाही. कोणी वापर केल्यास त्यांच्यावर खूप टीका होते. परंतु, आता आपण या गोष्टीला मान्यता देण्याचा विचार करत आहोत, असे कुंबळेने नमूद केले.

तसेच त्याने २०१८ सालच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाचे उदाहरण दिले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर १-१ वर्षाची, तर कॅमरन बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. आयसीसीने त्यावेळी काही निर्णय घेतला आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिक कठोर निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत आहे, असे कुंबळे म्हणाला.

First Published on: May 25, 2020 4:52 AM
Exit mobile version