वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतील पराभव विसरलेलो नाही!

वर्ल्डकपच्या अंतिम फेरीतील पराभव विसरलेलो नाही!

लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. नियमित सामना आणि सुपर ओव्हरनंतरही या दोन्ही संघांमध्ये बरोबरी होती. मात्र, सर्वाधिक चौकार-षटकार लगावल्यामुळे इंग्लंडला या सामन्याचा विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे त्यांनी घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकला. या सामन्याला आता दोन महिने होऊन गेले आहेत. मात्र, अजूनही आम्ही तो पराभव विसरू शकलेलो नाही, असे विधान न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने केले.

आम्ही दररोज काही गोष्टींबाबत चर्चा करतो आणि यामध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा उल्लेख होतो. आमचे खेळाडू अजूनही त्या पराभवाचा विचार करत आहेत. तो सामना फारच उत्कृष्ट झाला. त्या सामन्याचा शेवटही फार वेगळा झाला. आम्ही जेतेपद पटकावले नाही, यात कोणाची चूक होती, असे मी म्हणणार नाही. काही वर्षांनी आम्ही जेव्हा विचार करू, तेव्हा त्या उत्कृष्ट सामन्यात खेळल्याचे आम्हाला समाधान असेल, असे विल्यमसन आयसीसीच्या मुलाखतीत म्हणाला.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. याचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था बिकट होती. मात्र, बेन स्टोक्सने केलेल्या नाबाद ८४ धावांमुळे इंग्लंडने या सामन्यात बरोबरी केली. हा सामना संपल्यानंतर विल्यमसनने दाखवलेल्या संयमामुळे त्याचे खूप कौतुक झाले. त्याला न्यूझीलंडर ऑफ द इयर या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले. न्यूझीलंडमध्ये परतल्यानंतर चाहत्यांनी दर्शवलेला पाठिंबा फारच अप्रतिम होता, असे विल्यमसन म्हणाला. मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांनी आम्हाला खूप पाठिंबा दिला. चाहत्यांची प्रतिक्रिया पाहून फार बरे वाटले. लोकांना तो सामना पाहताना फार मजा आली, जी आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे विल्यमसनने सांगितले.

खेळाडूंचा अभिमान!

न्यूझीलंडला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागली होती. त्यांचे बरेचसे साखळी सामने चुरशीचे झाले. सर्व साखळी सामन्यांच्या अंती न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे ११-११ गुण होते. परंतु, न्यूझीलंडने सरस नेट-रनरेटमुळे आगेकूच केली. त्यामुळे खेळाडू प्रत्येक सामन्यात ज्याप्रकारे लढले, त्याचा मला अभिमान आहे, असे विल्यमसन म्हणाला. आमच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात झुंजार खेळ केला. आम्ही वेगवेगळे खेळाडू म्हणून नाही, तर संघ म्हणून एकत्र खेळलो. विश्वचषकात खेळत आहोत, म्हणून आम्ही आमची खेळण्याची पद्धत बदलली नाही, असे विल्यमसन म्हणाला.

First Published on: September 12, 2019 5:09 AM
Exit mobile version