एका पराभवाने जगाचा अंत नाही!

एका पराभवाने जगाचा अंत नाही!

न्यूझीलंडने उत्कृष्ट खेळ केला आणि ते जिंकले. मात्र, एका पराभवाने जगाचा अंत होत नाही, असे उद्गार भारताचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यानंतर काढले. वेलिंग्टनमध्ये झालेला हा कसोटी सामना न्यूझीलंडने १० विकेट राखून जिंकत दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा हा १४ महिन्यांतील पहिला पराभव होता. मात्र, या पराभवाचा फारसा विचार करण्याची गरज नाही, असे कोहलीला वाटते.

आम्ही या सामन्यात चांगली कामगिरी केली नाही. काही लोक यातून राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, आम्ही त्यांच्याप्रमाणे विचार करत नाही. एका पराभवाने जगाचा अंत होत नाही. आमच्यासाठी हा फक्त एक क्रिकेट सामना होता, जो आम्ही गमावला. मात्र, या पराभवाचा फारसा विचार न करता पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे कोहली म्हणाला.

तसेच त्याने पुढे सांगितले, आम्हाला जिंकायचे असेल, तर चांगला खेळ करण्यावाचून पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला पराभूत करणे सोपे नसते. प्रतिस्पर्धी संघ तुमच्यापेक्षा चांगला खेळ करुन जिंकू शकतो हे तुम्ही स्वीकारले पाहिजे. लोक काहीतरी बोलणारच. आम्ही जर त्या गोष्टींचा विचार केला असता, तर आम्ही जागतिक क्रमवारीत सातव्या किंवा आठव्या स्थानी असतो. एका पराभवाने आमचा संघ वाईट होत नाही.

धावा होत नसल्या, तरी मी चांगली फलंदाजी करतोय!

विराट कोहलीला न्यूझीलंड दौर्‍यात धावांसाठी झुंजावे लागले आहे. त्याला चार टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी डावांत मिळून केवळ एक अर्धशतक करता आले आहे. याविषयी पहिल्या कसोटीनंतर कोहली म्हणाला, मी चांगली फलंदाजी करत आहे. तुम्ही कशाप्रकारे फलंदाजी करत आहात हे काहीवेळा धावसंख्येतून कळत नाही. तुम्ही जेव्हा इतके सामने खेळता, तेव्हा तुम्हाला ३-४ डावांत मोठी खेळी करण्यात अपयश येऊच शकते.

First Published on: February 25, 2020 3:43 AM
Exit mobile version