दडपण नाही, ही तर संधी!

दडपण नाही, ही तर संधी!

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. इतकेच काय तर धावांचा पाठलाग करतानाची त्याची कामगिरी लक्षात घेता अनेकांच्या मते तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४३ शतके केली असून यापैकी २६ शतके धावांचा पाठलाग करताना आली आहेत. धावांचा पाठलाग करताना त्याने इतके यश मिळवल्याने नक्की त्याच्या डोक्यात काय सुरु असते असा प्रश्न अनेकांना पडतो. अखेर कोहलीने याचे उत्तर बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बालशी बोलताना दिले.

धावांचा पाठलाग करताना मला काय करायचे आहे हे माहित असते. त्यातच जर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू काहीतरी बोलला, तर माझ्यातील जिद्द अधिकच वाढते. मी लहान असताना टीव्हीवर सामने पाहायचो. एखाद्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ पराभूत झाला, तर मी तो सामना भारताला जिंकवून दिला असता असा विचार करायचो. धावांचा पाठलाग करताना नक्की किती धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी काय केले पाहिजे हे तुम्हाला माहित असते. माझ्या मते याहून सोपी परिस्थिती नाही. आता या परिस्थितीकडे तुम्ही कसे पाहता हे तुमच्या हातात आहे. मी याकडे दडपण नाही, तर संधी म्हणून पाहतो, असे कोहली म्हणाला.

तसेच त्याने पुढे सांगितले, मी जिंकण्यासाठी खेळतो. ५० षटकांत अगदी ३७०-३८० धावांचा पाठलाग करण्याचाही माझ्यात विश्वास असतो. आम्ही एखादे लक्ष्य गाठू शकत नाही असे मला कधीही वाटत नाही. मला अजून आठवते, आम्ही २०१२ साली होबार्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळलो होतो. आम्हाला तिरंगी मालिकेची अंतिम फेरी गाठण्यासाठी तो सामना ४० षटकांत जिंकणे गरजेचे होते आणि आम्हाला ३३० धावांचे लक्ष्य गाठायचे होते. त्यावेळी मी सुरेश रैनासोबत चर्चा केली होती की, आपण ४० षटकांचा विचार न करता याकडे दोन टी-२० सामन्यांप्रमाणे पाहूया. आम्ही हेच केले आणि सामना जिंकलो.

पहिल्या शतकामुळे आत्मविश्वास वाढला
मी तुला पहिल्यांदा २००९ मध्ये श्रीलंकेत पाहिले होते. त्यावेळचा विराट आणि त्यानंतर २-३ वर्षांनंतरचा विराट यात फलंदाज म्हणून खूप फरक होता. याबाबत काय सांगशील असे तमिमने कोहलीला विचारले. यावर कोहली म्हणाला, मी एक मालिका खेळलो आणि त्यानंतर मला संघातून वगळण्यात आले. मात्र, २००९ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये माझे भारतीय संघात पुनरागमन झाले. या स्पर्धेच्या दोन-तीन सामन्यांत मी चांगला खेळलो. एकदा मला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. मात्र, मी जेव्हा धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकवले, तेव्हा माझा आत्मविश्वास खूप वाढला. मी भारतासाठी बरीच वर्षे खेळू शकतो असे मला त्यानंतर वाटू लागले.

First Published on: May 21, 2020 4:57 AM
Exit mobile version