ही तर फक्त सुरुवात! – श्रेयस अय्यर

ही तर फक्त सुरुवात! – श्रेयस अय्यर

Shreyas Iyer

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या ’पात्रता फेरी-२’मधील सामन्यात झालेल्या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचे पहिल्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र, दिल्लीच्या युवा संघाने यंदा अप्रतिम प्रदर्शन केले. त्यांनी १४ पैकी तब्बल ९ साखळी सामने जिंकत तब्बल ७ वर्षांनी आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश केला. या बाद फेरीतील पहिल्या सामन्यात त्यांनी सनरायजर्स हैद्राबादचा पराभव करत विक्रमही रचला. आयपीएलच्या बाद फेरीतील सामना जिंकण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. मात्र, त्यांना यापुढील सामना जिंकण्यात अपयश आले. पण, असे असतानाही दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या कामगिरी खुश असून ही तर फक्त सुरुवात आहे, असे तो म्हणाला.

हा मोसम आमच्यासाठी खूप चांगला होता, पण ही फक्त सुरुवात आहे. आम्ही पुढील वर्षी यापेक्षाही चांगली कामगिरी करू याची मला खात्री आहे. आम्ही संघ म्हणून खूप चांगले खेळलो, पण आता आम्हाला अजून परिपक्व होण्याची गरज आहे. कर्णधार म्हणून मला आमच्या संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे. मागील वर्षी आम्ही चांगले खेळलो नाही. मात्र, यावर्षी आम्ही सुरुवातीपासूनच ज्याप्रकारे खेळलो आणि प्रत्येक खेळाडूने ज्या जबाबदारीने खेळ केला, ते खूपच वाखाणण्याजोगे आहे, असे श्रेयस म्हणाला.

तसेच त्याने संघाच्या चांगल्या प्रदर्शनाचे श्रेय प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला दिले. पॉन्टिंगसारखा व्यक्ती जेव्हा संघाला काही सांगतो, त्यानंतर कोणालाही अजून काही बोलावे लागत नाही. युवा खेळाडू म्हणून आम्हाला त्याच्यासारखा प्रशिक्षक मिळणे हे आमचे भाग्य आहे. तो प्रत्येक खेळाडूला आपला नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक देतो आणि युवा खेळाडूंना हेच हवे असते, असे श्रेयसने सांगितले.

First Published on: May 13, 2019 4:23 AM
Exit mobile version