ऑलिम्पिक पदकासाठी वेळ लागला, मात्र भारतीय हॉकीचे भवितव्य उज्ज्वल; कर्णधार मनप्रीतला विश्वास

ऑलिम्पिक पदकासाठी वेळ लागला, मात्र भारतीय हॉकीचे भवितव्य उज्ज्वल; कर्णधार मनप्रीतला विश्वास

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग

भारताला ऑलिम्पिकच्या हॉकीमध्ये पुन्हा पदक जिंकण्यासाठी ४१ वर्षे वाट पाहावी लागली होती. परंतु, पुरुष हॉकी संघाने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) कांस्यपदक पटकावत हा पदकाचा दुष्काळ संपवला. भारताने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत जर्मनीचा ५-४ असा पराभव केला होता. भारतीय संघाच्या या कामगिरीबाबत कर्णधार मनप्रीत सिंग समाधानी होता. तसेच भारतीय हॉकीचे भवितव्य उज्ज्वल असल्याचेही मत मनप्रीतने व्यक्त केले. भारतीय संघ २००८ सालच्या ऑलिम्पिकसाठी पात्रही ठरला नव्हता. परंतु, त्यानंतर आमच्या कामगिरीत खूप सुधारणा झाली आहे. आम्हाला जागतिक क्रमवारीत सातत्याने बढती मिळत आहे. आम्हाला ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी वेळ लागला. परंतु, आता आपल्याकडे चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय हॉकीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे मनप्रीत म्हणाला.

भारतीय पुरुष हॉकी संघाचे आता एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा आणि वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य असल्याचे मनप्रीतने सांगितले. आम्ही टोकियोमधील आमच्या कामगिरीचा आता अधिक विचार करू. आम्ही काय चुका केल्या आणि कशात सुधारणा झाली पाहिजे हे पाहून आगामी स्पर्धांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू, असेही भारतीय कर्णधाराने नमूद केले.

तसेच भारतीय महिला हॉकी संघही आता पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे कर्णधार राणी रामपालने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चांगली कामगिरी करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट असणे खूप गरजेचे आहे. आम्ही ऑलिम्पिकसाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार फिटनेसवर मेहनत घेत होतो, असेही राणी म्हणाली. भारतीय महिला हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली होती. परंतु, त्यांना पदक जिंकता आले नाही.


हेही वाचा – पाकविरुद्ध स्पर्धेच्या सुरुवातीलाच खेळणे कधीही चांगले – गंभीर


 

First Published on: August 17, 2021 10:47 PM
Exit mobile version