Tokyo Olympics : ऑलिम्पिक पदार्पणात पहिल्याच सामन्यात बॉक्सर आशिष कुमार पराभूत

Tokyo Olympics : ऑलिम्पिक पदार्पणात पहिल्याच सामन्यात बॉक्सर आशिष कुमार पराभूत

ऑलिम्पिक पदार्पणात पहिल्याच सामन्यामध्ये बॉक्सर आशिष कुमार पराभूत

भारताचा बॉक्सर आशिष कुमार चौधरीचे ऑलिम्पिक पदार्पण विसरण्याजोगेच ठरले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७५ किलो वजनी गटाच्या पहिल्याच फेरीत आशिषला चीनच्या एर्बिके तौहेताने पराभूत केले. आशियाई स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेत्या आशिषने या सामन्याच्या तिसऱ्या फेरीत आक्रमक खेळ केला. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील निराशाजनक खेळाचा फटका त्याला बसला. चीनच्या तौहेताने हा सामना ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकला. ‘आम्हाला चिनी खेळाडूला शारीरिकदृष्ट्या थकवायचे होते. मात्र, आशिषला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी हल्ला करता आला नाही. त्याने तिसऱ्या फेरीत चांगला खेळ केला, पण तोपर्यंत उशीर झालेला होता,’ असे भारताचे प्रशिक्षक सॅंटियागो निएवा म्हणाले.

छोट्या-छोट्या चुका महागात पडल्या

आशिषने या सामन्याच्या तिसऱ्या फेरीत आक्रमक खेळ करत चीनचा खेळाडू एर्बिके तौहेतावर जोरदार हल्ला चढवला. पाचही पंचांनी या फेरीचा निकाल आशिषच्या बाजूने लावला. परंतु, पहिल्या दोन फेरीत त्याने बचाव करताना बऱ्याच चुका केल्या. ‘पहिल्या दोन फेरीत आशिषला आणखी चांगला बचाव करता आला असता. त्याने केलेल्या छोट्या-छोट्या चुका त्याला महागात पडल्या. मात्र, त्याने झुंज देण्याचा प्रयत्न केला,’ असेही सॅंटियागो निएवा यांनी म्हटले.

बुधवारी लोव्हलिना बोर्गोहेनचा सामना 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत गारद होणारा आशिष हा भारताचा तिसरा बॉक्सर ठरला. याआधी विकास कृष्णन (६९ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनाही पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता बुधवारी लोव्हलिना बोर्गोहेन बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल. महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उप-उपांत्यपूर्व फेरीत बोर्गोहेनचा जर्मनीच्या नादीन अपेट्झशी सामना होईल.

First Published on: July 26, 2021 5:14 PM
Exit mobile version