Tokyo Olympics : पदक न जिंकल्याचे दुःख नाही; गोल्फर आदिती अशोक कामगिरीबाबत समाधानी

Tokyo Olympics : पदक न जिंकल्याचे दुःख नाही; गोल्फर आदिती अशोक कामगिरीबाबत समाधानी

भारताची गोल्फर आदिती अशोक

भारतीय पथकाने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये विक्रमी कामगिरी केली. भारताने यंदा सात पदके जिंकली आणि एका ऑलिम्पिकमधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. मात्र, या ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडू असेही होते, ज्यांना पदक जिंकता आले नसले तरी त्यांनी दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला. यात गोल्फपटू आदिती अशोकचा समावेश होता. २३ वर्षीय आदितीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने तिचे पदक हुकले. आदितीला पदक जिंकायला नक्कीच आवडले असते, पण तिला कोणत्याही गोष्टीचे दुःख नाही.

मी माझी सर्वोत्तम कामगिरी केली

ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर समाधान कोणालाही आवडत नाही. मात्र, मी माझी सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे पदक जिंकले नसले, तरी मला कोणत्याही गोष्टीचे दुःख नाही. मी फार चुका केल्या नाहीत. मी यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ज्याप्रकारे खेळले, त्याचा आनंद आहे. पुढेही मेहनत सुरु ठेवण्याचे आणि चांगली कामगिरी करण्याचे माझे लक्ष्य आहे. भविष्यात मला पदक जिंकण्याची पुन्हा संधी मिळेल अशी आशा असल्याचे आदिती म्हणाली.

माझ्यासाठी हा उत्तम अनुभव

तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये तुझ्याकडून काय चुका झाल्या असे विचारले असता आदितीने सांगितले, गोल्फमध्ये कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली खेळाडू, माजी अव्वल खेळाडू आणि मागील ऑलिम्पिकमधील पदकविजेत्या खेळाडूंविरुद्ध मी खेळत होते. त्यामुळे मी माझ्या कामगिरीने खुश आहे. इतक्या चांगल्या खेळाडूंविरुद्ध मी चांगली खेळू शकते आणि त्यांना झुंज देऊ शकते, हे मला कळले. माझ्यासाठी हा उत्तम अनुभव होता. या कामगिरीने माझा आत्मविश्वास वाढला आहे.

First Published on: August 11, 2021 7:30 PM
Exit mobile version