Tokyo Olympics : अनिवार्य नसले तरी भारतीय खेळाडूंचे लसीकरण झालेले असेल; IOA अध्यक्षांची माहिती

Tokyo Olympics : अनिवार्य नसले तरी भारतीय खेळाडूंचे लसीकरण झालेले असेल; IOA अध्यक्षांची माहिती

ऑलिम्पिकपूर्वी भारतीय खेळाडूंचे लसीकरण झालेले असेल; नरिंदर बात्रा यांची माहिती

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचे लसीकरण जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालेले असेल, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी गुरुवारी दिली. कोरोनामुळे एका वर्षाने पुढे ढकलण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांचे जवळपास २०० जणांचे पथक टोकियोला जाणार आहे. टोकियोला रवाना होण्यापूर्वीच सर्वांचे लसीकरण झालेले असेल, असे बात्रा यांनी सांगितले.

राष्ट्रीय संघटनांना विनंती केली 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) खेळाडूंना लस घेणे अनिवार्य केलेले नाही. परंतु, आम्ही सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना आपापल्या खेळाडूंचे लसीकरण करून घेण्याची विनंती केली आहे. आमचे खेळाडू सुरक्षित राहावेत असे आम्हाला वाटते. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी टोकियोला जाणाऱ्या भारतीय पथकाचे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लसीकरण पूर्ण झालेले असेल. खेळाडू आणि सर्व अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस दिलेले असतील, असे बात्रा म्हणाले.

किमान १० पदके मिळतील

तसेच भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये किमान १० पदके मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमचे खेळाडू कसून सराव करत आहेत. त्यामुळे आमच्या अपेक्षांमध्ये बदल झालेला नाही. भारतीय खेळाडूंना दोन आकडी पदके मिळतील, असे बात्रा यांनी सांगितले. तसेच भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाकडून पदकाची अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.

First Published on: June 10, 2021 7:06 PM
Exit mobile version