Tokyo Olympics : ‘भारतीय नारी सब पे भारी’! रौप्यपदक विजेत्या मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव

Tokyo Olympics : ‘भारतीय नारी सब पे भारी’! रौप्यपदक विजेत्या मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव

रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूवर कौतुकाचा वर्षाव 

‘गजब. भारतीय नारी सब पे भारी,’ असे म्हणत भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचे अभिनंदन केले. या केवळ सेहवागच्या नाही, तर संपूर्ण भारताच्या भावना होत्या. मीराबाईला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही वजन उचलत आले नव्हते. त्यामुळे तिला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. पाच वर्षांनंतर मात्र आता चित्र पूर्णपणे वेगळे आहे. मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. तिने एकूण २०२ किलोचे (८७+११५) वजन उचलत ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले. तिच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

मणिपूरमध्ये जल्लोष 

मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकताच मणिपूरमध्ये तिचे कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या सर्वांनी जल्लोष केला. हे सर्व जण सकाळी उठून मीराबाईचा खेळ टीव्हीवर पाहत होते. ‘आम्हाला खूप आनंद झाला आहे. मीराने खूप मेहनत घेतली असून त्याचे तिला फळ मिळाले आहे. भारत आणि मणिपूरला तिचा अभिमान आहे,’ असे मीराबाईच्या नातेवाईकांनी सांगितले. मीराबाईच्या कामगिरीचे क्रीडा, मनोरंजन आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रातून कौतुक झाले.

First Published on: July 24, 2021 9:42 PM
Exit mobile version