Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार; प्रशिक्षक गोपीचंद यांना विश्वास

Tokyo Olympics : ऑलिम्पिकमध्ये सिंधू सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार; प्रशिक्षक गोपीचंद यांना विश्वास

ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधू सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू प्रबळ दावेदार असल्याचे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. विश्वविजेत्या सिंधूला २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात यश आले होते. यंदाही सिंधू दमदार कामगिरी करेल असा गोपीचंद यांना विश्वास आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने १२० हून अधिक खेळाडूंचे पथक पाठवले आहे. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये भारताला १० हूनही अधिक पदके मिळवण्यात यश आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे गोपीचंद म्हणाले.

१० हूनही अधिक पदके मिळू शकतील

भारताला यंदा आतापर्यंतची ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश येईल अशी मला आशा आहे. भारताने २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके मिळवली होती. यंदा मात्र भारताला १० हूनही अधिक पदके मिळू शकतील. सरकारने खेळाडूंना खूप मदत केली आहे. त्यांना पुरेसा सराव मिळालेला आहे. त्यामुळे कुस्ती किंवा बॉक्सिंगमध्ये आपल्याला पदके मिळू शकतील, असे गोपीचंद म्हणाले.

बॅडमिंटनमध्ये चांगल्या कामगिरीची संधी 

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू पदक जिंकण्याची शक्यता आहे. बॅडमिंटनमध्ये यंदा रिओ आणि लंडन ऑलिम्पिकपेक्षाही चांगली कामगिरी करण्याची आपल्याकडे संधी आहे. विशेषतः सिंधू ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तिच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकिरेड्डी यांच्यासमोर खडतर आव्हान आहे. परंतु, तेसुद्धा पदक जिंकू शकतील, असे गोपीचंद यांनी नमूद केले.

First Published on: July 21, 2021 6:55 PM
Exit mobile version