Tokyo Olympics : टेनिसपटू सुमित नागलचे आव्हान संपुष्टात; मेदवेदेव्हकडून पराभूत

Tokyo Olympics : टेनिसपटू सुमित नागलचे आव्हान संपुष्टात; मेदवेदेव्हकडून पराभूत

टेनिसपटू सुमित नागलचे आव्हान संपुष्टात

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारी भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा टेनिसपटू सुमित नागलचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमधील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने नागलला ६-२, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. पहिल्या फेरीत नागलने विक्रमी कामगिरी करताना उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनचा पराभव केला होता. ऑलिम्पिकच्या टेनिस एकेरीत सामना जिंकणारा तो २५ वर्षांतील पहिला भारतीय खेळाडू ठरला होता. परंतु, दुसऱ्या फेरीत त्याला सूर गवसला नाही. दुसऱ्या सीडेड मेदवेदेव्हला पराभूत करणे नागलला अवघड जाणार हे अपेक्षित होते. परंतु, त्याला या सामन्यात फारशी झुंजही देता आली नाही.

मेदवेदेव्हचा सुरुवातीपासून उत्कृष्ट खेळ

दुसऱ्या फेरीतील सामन्यात मेदवेदेव्हने नागलला ६-२, ६-१ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. हा सामना अवघ्या १ तास सहा मिनिटांत संपला. या सामन्याच्या सुरुवातीपासून मेदवेदेव्हने उत्कृष्ट खेळ केला. पहिल्या सेटमध्ये त्याने ४-१ अशी मोठी आघाडी घेतली. त्यानंतर नागलला पुनरागमन करता आले नाही आणि मेदवेदेव्हने हा सेट ६-२ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही मेदवेदेव्हने आक्रमक खेळ करताना ४-१ अशी मोठी आघाडी मिळवली. त्यानेच पुढील दोन्ही गेम जिंकत हा सेट ६-१ असा खिशात टाकला.

सानिया-अंकिताचाही पराभव 

त्याआधी रविवारी महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांचेही आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत युक्रेनच्या नादिया आणि लिऊदम्यला किचेनॉक या भगिनींनी सानिया-अंकिताला ६-०, ६-७ (०-७), १०-८ असे पराभूत केले. सानिया आणि अंकिताने पहिल्या सेटमध्ये उत्कृष्ट खेळ केला. मात्र, दुसऱ्या सेटच्या टाय-ब्रेकरमध्ये भारतीय जोडीचा खेळ खालावला आणि त्यांनी हा सामना गमावला.

First Published on: July 26, 2021 12:52 PM
Exit mobile version