कसोटीत नाणेफेक नकोच!

कसोटीत नाणेफेक नकोच!

डू प्लेसिसचे मत

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेच्या तीनही सामन्यांत नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. त्यातच त्याने आशियामध्ये सलग ९ सामन्यांत नाणेफेक गमावली होती. त्यामुळे या मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात फॅफसोबत उपकर्णधार टेंबा बवूमा ’प्रॉक्सी’ कर्णधार म्हणून नाणेफेकीला आला. मात्र, त्यालाही नाणेफेक जिंकता आले नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये नाणेफेक नसल्यास पाहुण्या संघाचा फायदा होऊ शकेल आणि कसोटी सामने चुरशीचे होतील, असे मत डू प्लेसिसने व्यक्त केले.

प्रत्येक कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात ५०० हूनही अधिक धावसंख्या उभारली. दुसर्‍या दिवशी तिसर्‍या सत्रात कमी सूर्यप्रकाश असताना त्यांनी आपला डाव घोषित केला. त्यानंतर त्यांनी झटपट आमचे तीन गडी बाद केले. त्यामुळे तिसर्‍या दिवशी खेळ सुरु होण्याआधीच आमचा संघ दबावात होता. प्रत्येक सामन्यात हेच घडले. आम्ही जर नाणेफेक गमावली नसती, तर हे घडलेच नसते. कसोटीत नाणेफेक नसल्यास पाहुण्या संघालाही सामना जिंकण्याची संधी मिळू शकेल, असे डू प्लेसिस म्हणाला.

माजी खेळाडूंची मदत गरजेची!

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची मागील काही वर्षांत कामगिरी खूप खालावली आहे. त्यांचे बरेच अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्याने त्यांना नवा संघ उभारणे भाग पडले आहे. दक्षिण आफ्रिकेला पुन्हा अव्वल संघ बनवायचे असल्यास माजी खेळाडूंची मदत घेणे गरजेचे आहे, असे फॅफ डू प्लेसिसला वाटते. आम्हाला आता पुढील योजना आखण्याची गरज आहे. कोणीतरी एकानेच निर्णय घेणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या माजी खेळाडूंची मदत घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यातही आव्हाने आहेत. आमच्या युवा संघाला अनुभवाची गरज आहे आणि त्यासाठी माजी खेळाडू आताच्या युवा खेळाडूंना मदत करू शकतील, असे डू प्लेसिस म्हणाला.

First Published on: October 28, 2019 4:12 AM
Exit mobile version