विनेश फोगाटची वर्ल्ड चॅम्पिअनशिपमधून माघार

विनेश फोगाटची वर्ल्ड चॅम्पिअनशिपमधून माघार

विनेश फोगाट (सौ-facebook)

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाटने आगामी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली आहे. लखनऊ येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय शिबीरात विनेशच्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे तिला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तिचे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत खेळणे जोखमीचे ठरू शकते.

२०१८ मध्ये अप्रतिम प्रदर्शन

विनेश फोगाटने यावर्षी अप्रतिम प्रदर्शन केले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने ५० किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. इंडोनेशियात झालेल्या एशियाड स्पर्धेतही विनेशने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. एशियाडमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती.  तिच्या याच अप्रतिम प्रदर्शनामुळे कुस्ती महासंघाने पात्रता फेरी न खेळताच तिची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड केली होती. तिला या स्पर्धेतही सुवर्ण पदकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यामुळे विनेशने स्पर्धेतून घेतलेली माघार हा भारतासाठी मोठा धक्का आहे.

विनेशच्या जागी रितू फोगाट

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विनेशच्या जागी रितू फोगाट ५० किलो वजनी गटात खेळेल. रितू याआधी ५३ किलो वजनी गटात खेळणार होती. पण विनेशने स्पर्धेतून माघार घेतल्याने रितूला आपल्या नेहमीच्या वजनी गटात खेळायला मिळेल. तर ५३ किलो वजनी गटात खेळण्यासाठी पिंकीची निवड झाली आहे. पिंकीला या स्पर्धेतील निवडीसाठी कुस्ती महासंघाने पात्रता फेरीत खेळण्यास सांगितले होते. पात्रता फेरीत खेळण्यासाठी पिंकीने नकार दिल्यानंतर तिची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली नव्हती. पण विनेशच्या दुखापतीमुळे पिंकीला संधी देण्याचा निर्णय कुस्ती महासंघाने घेतला आहे.
First Published on: September 24, 2018 9:02 PM
Exit mobile version