IND vs ENG : कर्णधार, उपकर्णधाराची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग; चौथ्या कसोटीच्या तयारीला सुरुवात 

IND vs ENG : कर्णधार, उपकर्णधाराची नेट्समध्ये जोरदार बॅटिंग; चौथ्या कसोटीच्या तयारीला सुरुवात 

विराट कोहली

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेची भारताने निराशाजनक सुरुवात केली होती. भारताने पहिला कसोटी सामना गमावला होता. त्यानंतर मात्र भारताने दमदार पुनरागमन करत दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला. तर अहमदाबाद येथे नव्याने बांधण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेला तिसरा कसोटी सामना भारताने अवघ्या दोन दिवसांतच जिंकत चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. आता या मालिकेतील चौथा कसोटी सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच होणार असून भारतीय संघाने या कसोटीच्या तयारीला सुरुवात केली आहे. कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर रोहित शर्मा या भारताच्या प्रमुख फलंदाजांनी सोमवारी नेट्समध्ये फलंदाजीचा कसून सराव केला. बीसीसीआयने याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला.

रोहितची शास्त्री यांच्याशी चर्चा 

भारताचा अनुभवी सलामीवीर रोहितने या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ३ कसोटीत २९६ धावा केल्या असून यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. रोहितनेही सोमवारी नेट्समध्ये जोरदार बॅटिंग केली. तसेच तो आणि कोहली प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करतानाही दिसले.

चौथी कसोटी ४ मार्चपासून 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला ४ मार्चपासून सुरुवात होणार असून या सामन्याची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल असे म्हटले जात आहे. याचा फायदा भारताचे फिरकीपटू अश्विन आणि अक्षर पटेल यांना होऊ शकेल. अक्षरने तिसऱ्या कसोटीत ११ विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. सोमवारी तो नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला.

First Published on: March 1, 2021 10:44 PM
Exit mobile version