IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कर्णधार कोहलीच्या नावे झाला अनोखा विक्रम

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कर्णधार कोहलीच्या नावे झाला अनोखा विक्रम

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरल्यावर एखादा विक्रम होत नाही असे फार कमी वेळा होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात झाली व या सामन्यातही कोहलीने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांत आटोपला. याचे उत्तर देताना पहिल्या दिवसअखेर भारताची ३ बाद ९९ अशी धावसंख्या होती. रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद ५७ धावांची खेळी केली. त्याला कोहलीने चांगली साथ दिली. मात्र, कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो २७ धावा करून बाद झाला. परंतु, या छोटेखानी खेळीदरम्यान त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला.

दोन हजार धावांचा टप्पा पार

कोहलीने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा कोहली भारताचा पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना इंग्लंडविरुद्ध १९१० धावा केल्या होत्या. कोहलीने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत २०२४ धावा केल्या आहेत.

जागतिक क्रिकेटमधील पाचवा कर्णधार

इंग्लंडविरुद्ध दोन हजार धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा जागतिक क्रिकेटमधील पाचवा कर्णधार आहे. याआधी ही कामगिरी ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅलन बॉर्डर (३१९१), दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (२९७८), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२७२६) आणि ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन (२४३२) यांनी केली होती.

 

First Published on: February 24, 2021 11:02 PM
Exit mobile version