IND vs AUS : अपयशानंतरच यशाची खरी किंमत कळते; टीम इंडियाचे सोशल मीडियावर कौतुक    

IND vs AUS : अपयशानंतरच यशाची खरी किंमत कळते; टीम इंडियाचे सोशल मीडियावर कौतुक    

भारतीय संघ 

रिषभ पंतच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३ विकेट राखून पराभूत केले. ऑस्ट्रेलियन संघ गॅबावर तब्बल ३२ वर्षे अपराजित होता. मात्र, अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १९८८ नंतर पहिल्यांदा गॅबाच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम केला. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी आपल्या खिशात घातली. हा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ३२८ धावांचे आव्हान ठेवले होते. युवा सलामीवीर शुभमन गिलने ९१ धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा (५६) आणि रिषभ पंत (नाबाद ८९) यांच्या महत्वपूर्ण खेळींमुळे भारताने ३२८ धावांचे लक्ष्य ३ विकेट राखून गाठले. त्यामुळे भारतीय संघाचे सोशल मीडियावर आजी-माजी खेळाडूंनी कौतुक केले.

अप्रतिम विजय! अ‍ॅडलेड कसोटीनंतर ज्यांनी आमच्याविषयी शंका उपस्थित केली होती, त्यांनी हा विजय लक्षात ठेवावा. भारतीय संघाने संपूर्ण मालिकेत जी जिद्द दाखवली आणि ज्या निडरपणे खेळ केला, त्याचे कौतुक झालेच पाहिजे. सर्व खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाचे अभिनंदन. – विराट कोहली

प्रत्येक भारतीयाने आणि प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही ३६ किंवा त्याहूनही कमी धावा केल्या तरी सगळे संपले असे नाही. अपयशानंतरच यशाची खरी किंमत कळते. मात्र, यश मिळवल्यावर, जे लोक विपरीत परिस्थितीत तुमच्यासोबत होते, त्यांना विसरू नका. त्यांच्यासोबत हे यश साजरे करा. – सचिन तेंडुलकर

हा विजय इतिहासात जमा होणार आहे. भारताच्या युवा संघाने अनुभवी ऑस्ट्रेलियन संघावर मात केली. भारताकडून खेळतानाही मला इतका अभिमान वाटला नव्हता. भारतीय संघाचे अभिनंदन. – युवराज सिंग 

First Published on: January 19, 2021 9:44 PM
Exit mobile version