हे याआधी क्रिकेटमध्ये कधीही पाहिले नव्हते!

हे याआधी क्रिकेटमध्ये कधीही पाहिले नव्हते!

वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नई येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. या सामन्यात पंच शॉन जॉर्ज यांच्या एका निर्णयाविषयीही बरीच चर्चा झाली. या सामन्यात भारताचा अष्टपैलू रविंद्र जाडेजा २१ धावांवर धावचीत झाला. भारताच्या डावातील ४८ व्या षटकात जाडेजाने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच विंडीजच्या रॉस्टन चेसने चेंडू अचूक स्टम्पवर मारला. जाडेजाने धाव सहज पूर्ण केली असे वाटल्याने जॉर्ज यांनी तिसर्‍या पंचाकडे दाद मागितली नाही. परंतु, रिप्लेमध्ये जाडेजा धावचीत झाल्याचे दिसल्याने विंडीजचा कर्णधार पोलार्डने जॉर्ज यांच्याकडे विचारणा केली. तसेच त्याने डीआरएसचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जॉर्ज यांनी तिसर्‍या पंचांकडे निर्णय सोपवला. तिसरे पंच रॉड टकर यांनी जाडेजाला बाद ठरवले. मात्र, पंच जॉर्ज यांनी तिसर्‍या पंचांकडे निर्णय सोपवण्याआधी खूप वेळ घेतल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली संतापला. मी असा प्रकार याआधी क्रिकेटमध्ये कधीही पाहिलेला नाही, असे सामन्यानंतर तो म्हणाला.

क्षेत्ररक्षकाने अपील केल्यानंतर पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवले. त्यामुळे हा विषय तिथेच संपला पाहिजे होता. जे लोक मैदानाबाहेर बसून टीव्हीवर सामना पाहत आहेत, ते क्षेत्ररक्षकाला डीआरएसचा वापर करण्यास सांगू शकत नाहीत आणि तो क्षेत्ररक्षक पुढे पंचांकडे दाद मागू शकत नाही. मी असा प्रकार याआधी क्रिकेटमध्ये कधीही पाहिलेला नाही. हे प्रकार घडत असल्यास नियमांचा उपयोगच काय? माझ्या मते पंच आणि सामनाधिकार्‍यांनी हे प्रकरण पुन्हा पाहण्याची गरज आहे. त्यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी काहीतरी केले पाहिजे. मैदानाबाहेर बसलेले लोक मैदानात काय होत आहे, हे ठरवू शकत नाहीत, असे कोहली म्हणाला.

First Published on: December 17, 2019 3:08 AM
Exit mobile version