छोटा पॅकेट, बडा धमाका!

छोटा पॅकेट, बडा धमाका!

एका नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसाच प्रकार काही खेळाडूंबाबत असतो. ते जेव्हा खेळतात, तेव्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले जाते आणि जेव्हा खेळत नाहीत, तेव्हा क्रीडाप्रेमी अस्वस्त होतात. असाच एक खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा छोट्या चणीचा सलामीवीर डेविड वॉर्नर. फलंदाजीची आक्रमक शैली आणि त्यापेक्षाही आक्रमक वृत्तीचा वॉर्नर हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याच्या आक्रमक (कधीतरी अतिआक्रमक) वृत्तीमुळे तो बर्‍याचदा अडचणीत सापडला आहे. परंतु, एकदा का त्याची बॅट बोलायला लागली की, सगळे थक्क होऊन जातात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर ‘प्रॉब्लेम्स’चा डोंगर कोसळतो. नुकतीच श्रीलंकेच्या गोलंदाजांना याची प्रचिती आली. दीड वर्षांहूनही अधिक काळानंतर वॉर्नरला ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. अ‍ॅडलेड येथे झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वॉर्नरने अवघ्या ५६ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. हे त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक होते. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या सर्वात मोठ्या विजयाची (१३४ धावांनी) नोंद केली.

मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात झालेल्या ’बॉल टॅम्परिंग’ प्रकरणातील सहभागामुळे वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार होता. त्याच्यासह कर्णधार स्टिव्ह स्मिथवर एका वर्षाची, तर नवख्या कॅमरुन बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली. मात्र, या सर्व प्रकरणात वॉर्नरवर सर्वाधिक टीका झाली. स्मिथ, बँक्रॉफ्टने चाहत्यांची आणि क्रिकेट बोर्डाची माफी मागितल्यानंतर त्यांना थोडीफार सहानुभूती मिळाली. परंतु, वॉर्नरचा इतिहासच असा की, त्याला सहानुभूती मिळण्याची शक्यता कमीच होती आणि तसेच झाले. आक्रमक वृत्तीच्या वॉर्नरनेच बँक्रॉफ्टला ‘बॉल टॅम्परिंग’ करायला प्रवृत्त केले असणार असेही म्हटले गेले. परंतु, या आरोपांमुळे वॉर्नर खचून नाही गेला. त्याच्यातील आक्रमकता, जिद्द यावेळी त्याच्या कामी आली.

काही महिन्यांच्या कालावधीनंतर त्याने मैदानात पुनरागमन केले. त्याने ऑस्ट्रेलियातील क्लब क्रिकेट, बांगलादेश प्रीमियर लीग यासारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र, त्याची खरी कसोटी लागणार होती, ती म्हणजे आयपीएलमध्ये! वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएल संघ सनरायजर्स हैदराबादने खूप यश मिळवले, पण ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणानंतर त्यांनी वॉर्नरला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता वॉर्नर कशी कामगिरी करतो याकडे सार्‍यांचे लक्ष होते. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ८५ धावांची खेळी केली. त्याची बॅट अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत तळपली. वॉर्नरने या स्पर्धेच्या १२ सामन्यांत सर्वाधिक ६९२ धावा चोपून काढल्या, ज्यात १ शतक आणि ८ अर्धशतकांचा समावेश होता. ‘वॉर्नरला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे होते आणि ते त्याने केले’, असे सनरायजर्सचे प्रशिक्षक टॉम मुडी स्पर्धेनंतर म्हणाले.

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसांतच इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्डकपला सुरुवात होणार होती. वॉर्नर आणि स्मिथ या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ फारसा यशस्वी होत नव्हता. त्यामुळे या दोघांवरील बंदीचा कालावधी संपल्यानंतर त्यांचे वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले. वर्ल्डकपमध्ये स्मिथला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. मात्र, वॉर्नरने आयपीएलमधील दमदार फॉर्म कायम ठेवत वर्ल्डकपच्या १० सामन्यांत ३ शतके आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ६४७ धावा फटकावल्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो दुसर्‍या स्थानी होता. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला या वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, वॉर्नरच्या कामगिरीचे खूप कौतुक झाले.

वर्ल्डकपनंतर झालेल्या अ‍ॅशेस मालिकेसाठीही त्याची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी! त्यामुळे या मालिकेदरम्यान इंग्लंडच्या चाहत्यांनी नारेबाजी करत वॉर्नरला ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणाची सतत आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला असे म्हणणे वावगे ठरू नये. त्याला या मालिकेच्या ५ सामन्यांत मिळून ९.५० च्या सरासरीने केवळ ९५ धावा करता आल्या. त्यातच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने त्याला तब्बल सात वेळा बाद केले. मात्र, ‘या खराब कामगिरीमुळे वॉर्नरच्या खेळात सुधारणा झाली नाही आणि त्याच्यासारख्या उत्कृष्ट फलंदाजाने आगामी काळात दमदार कामगिरी केली नाही, तर मला आश्चर्य वाटेल’, असे ब्रॉडनेच बोलून दाखवले.

या मालिकेनंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजीत सुधारणा केलेला वॉर्नर पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३८ शतकांची (२१ कसोटी, १७ एकदिवसीय) नोंद करणार्‍या वॉर्नरला टी-२० क्रिकेटमध्ये मात्र एकही शतक करता आले नव्हते. परंतु, श्रीलंकेविरुद्ध त्याने हासुद्धा पराक्रम करून दाखवला. आता आगामी काळात त्याने आणखी बरीच शतके ठोकली, तर आश्चर्य वाटू नये.
– अन्वय सावंत

First Published on: October 30, 2019 4:58 AM
Exit mobile version