आम्ही तितकेही वाईट खेळलो नाही!

आम्ही तितकेही वाईट खेळलो नाही!

कर्णधार कोहलीचे उद्गार

न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत व्हाईटवॉश दिला असला तरी आम्ही तितकेही वाईट खेळलो नाही, असे मत तिसर्‍या एकदिवसीय सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी गमावली. मंगळवारी झालेल्या तिसर्‍या सामन्यात भारताने दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ५ विकेट राखून पूर्ण केले.

आम्ही एकदिवसीय मालिका ३-० अशी गमावली, पण आम्ही तितकेही वाईट खेळलो नाही. या मालिकेत आम्हालाही काही संधी मिळाल्या, पण त्या आंतरराष्ट्रीय सामना जिंकण्यासाठी पुरेशा नव्हत्या. गोलंदाजीत आम्हाला योग्यवेळी विकेट मिळवण्यात अपयश आले. आम्ही क्षेत्ररक्षणातही काही चुका केल्या. फलंदाजांनी खराब सुरुवातीनंतर चांगले पुनरागमन केले. परंतु, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आम्हाला संयम राखता आला नाही. आम्ही खूप वाईट खेळलो नाही. मात्र, तुम्हाला जर मिळालेल्या संधीचा उपयोग करत नाही, तर तुम्ही जिंकू शकत नाही. न्यूझीलंडने आमच्यापेक्षा दर्जेदार खेळ केला आणि ते जिंकले, असे कोहलीने सांगितले.

कसोटी मालिका जिंकू शकतो!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता २१ फेब्रुवारीपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेविषयी कर्णधार कोहली म्हणाला, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमुळे आता प्रत्येक कसोटी सामन्याचे महत्त्व वाढले आहे. आम्ही कसोटीत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आमचा कसोटी संघ खूप संतुलित आहे. आम्ही ही मालिका नक्कीच जिंकू शकतो. मात्र, त्यासाठी आम्ही सुरुवातीपासूनच सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे आहे.

First Published on: February 12, 2020 5:12 AM
Exit mobile version