IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ टाकणार ‘कर्णधार रहाणे’वर दबाव – लँगर 

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ टाकणार ‘कर्णधार रहाणे’वर दबाव – लँगर 

अजिंक्य रहाणे

भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर गेला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणार आहे. रहाणेने याआधी दोन वेळा भारताचे कर्णधारपद भूषवले असले तरी परदेशात भारताचे नेतृत्व करण्याची ही रहाणेची पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ रहाणेवर जास्तीतजास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी स्पष्ट केले आहे.

विराट कोहली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. विराटसारख्या खेळाडूच्या अनुपस्थितीत संघ कमकुवत होतोच. तसेच मोहम्मद शमी भारतासाठी नेहमीच महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे उर्वरित मालिकेत भारताला या दोघांची उणीव भासणार आहे. मात्र, आम्हाला केवळ दुसऱ्या कसोटीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. या कसोटीत आम्हाला सुरुवातीपासूनच चांगला खेळ करून रहाणेवर जास्तीतजास्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, असे लँगर म्हणाले.

भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात आघाडी मिळवली होती. मात्र, भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत आटोपला आणि भारताने हा सामना गमावला. या पराभवामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास खालावलेला असणार. त्यामुळे तुम्ही जर भारताचे प्रशिक्षक असतात, तर खेळाडूंना काय सल्ला दिला असतात, असे लँगर यांना विचारले असता त्यांनी सांगितले, भारतीय संघाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मला भारतीय संघासाठी सहानभूती आहे. मात्र, मी त्यांना काहीही सल्ला देणार नाही.

First Published on: December 24, 2020 8:43 PM
Exit mobile version