Wimbledon : सानिया मिर्झाची दमदार सुरुवात; महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश

Wimbledon : सानिया मिर्झाची दमदार सुरुवात; महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश

सानिया मिर्झा आणि बेथनी मॅटेक-सँड्स

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथनी मॅटेक-सँड्ससोबत खेळताना विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. सानिया आणि बेथनीने महिला दुहेरीमध्ये देसीरे क्रावझिक आणि अलेक्सा गुराची या सहाव्या सीडेड जोडीला ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानिया आणि बेथनीला या सामन्याच्या सुरुवातीला चांगला खेळ करता आला नाही. परंतु, त्यानंतर त्यांना लय सापडल्यावर त्यांनी हा सामना एक तास आणि २७ मिनिटांत सरळ सेटमध्ये जिंकला.

अडखळत्या सुरुवातीनंतर चांगले पुनरागमन 

पहिल्या सेटमध्ये सानिया आणि बेथनीवर प्रतिस्पर्धी जोडीने दबाव टाकला. परंतु, या दोघांनी अडखळत्या सुरुवातीनंतर चांगले पुनरागमन करत हा सेट ७-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया आणि बेथनीने गुराचीची सर्व्हिस मोडत ३-१ अशी आघाडी घेतली. यानंतर क्रावझिक आणि गुराचीला पुनरागमन करता आले नाही. त्यामुळे सानिया आणि बेथनीने दुसरा सेट ६-३ असा मोठ्या फरकाने जिंकत यंदाच्या विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली.

स्विटोलिनाला पराभवाचा धक्का

महिला एकेरीत युक्रेनच्या तिसऱ्या सीडेड एलिना स्विटोलिनाला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला पोलंडच्या माग्दा लिनेटेने ६-३, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यात लिनेटेने स्विटोलिनाची सर्व्हिस तीन वेळा मोडली. तसेच शेलबी रॉजर्सने मारिया साकारीचा ७-५, ६-४ असा पराभव केला.

First Published on: July 1, 2021 7:12 PM
Exit mobile version