शाकिब कामगिरी

शाकिब कामगिरी

शाकिब अल हसन

बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अष्टपैलू शाकिब अल हसनचे नाव घेतले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह विश्वचषक स्पर्धेतही सातत्याने चांगली कामगिरी करणार्‍या बांगलादेश संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या शाकिबने विश्वचषकात आतापर्यंत एक हजार धावा पूर्ण करत २८ बळी मिळवण्याची किमया केली आहे. ही कामगिरी करणारा शाकिब हा श्रीलंकेच्या सनथ जयसूर्यानंतर जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. याच ‘शाकिब’ कामगिरीच्या जोरावर बांगला टायगर्सच्या यंदाच्या विश्वचषकातील आशा अद्याप कायम आहेत.

गुणतालिकेत आता पाचव्या स्थानी असलेल्या बांगलादेशने आपल्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. यातही शाकिब अल हसनने दमदार कामगिरी करत ७५ धावांचे योगदान दिले. शिवाय एडन मार्करमचा महत्त्वपूर्ण अडथळा दूर करत आफ्रिकेला धक्का दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शाकिबने पुन्हा ६४ धावांची खेळी करत मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुनरो या दोघांचे बळीही टिपले. या सामन्यात त्यांना थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, शाकिबने बांगलादेशींचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.

यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही शाकिबने एकाकी झुंज देत विजयाकडे वाटचाल केली होती. मात्र, अन्य खेळाडूंकडून त्याला साथ न लाभल्याने बांगलादेश पराभूत झाला. या सामन्यात शाकिबने १२१ धावांची दमदार खेळी केली. श्रीलंकेविरुद्धचा सामना पाण्यात गेल्यानंतर विंडीजविरुद्धच्या सामन्यात मात्र दमदार पुनरागमन करत बांगलादेशने सर्वांनाच थक्क केले. या सामन्यात शाकिबच्याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने विजयावर शिक्कामोर्तब केले. नाबाद १२४ धावा आणि इव्हन लुईस, निकोलस पूरन यांना बाद करत शाकिबने सामनावीराचा किताबही पटकावला.

कांगारूंसोबतच्या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला, पण यातही त्यांनी ३८२ धावांचे अशक्यप्राय आव्हान पेलताना ३३३ धावांपर्यंत मजल मारत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला घाम फोडला होता. यात शाकिबने ४१ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत. या सामन्यातही शाकिबने षटकांत २९ धावा देत ५ बळी मिळवले. फलंदाजीतही त्याने अर्धशतकी खेळी करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. या पुढील सामन्यातही बांगलादेशी चाहत्यांना त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल. त्याने आपली दमदार कामगिरी सुरु ठेवली तरच बांगला टायगर्सची वाटचाल अंतिम सामन्याकडे होऊ शकेल, यात शंका नाही.

नंबर वन!
विश्वचषकात एक हजार धावांचा टप्पा गाठणारा शाकिब आता यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत फलंदाजांच्या यादीत प्रथम स्थानी विराजमान झाला आहे. यजमानांचा जो रूट आणि ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर यांना मागे टाकत शाकिब ४७६ धावांसह अव्वल आहे. गोलंदाजीतही त्याने सर्वोत्तम कामगिरी करत २९ धावांत ५ बळी घेत पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरला (३० धावांत ५ बळी) मागे टाकले आहे. सात सामन्यांमध्ये (एक सामना पावसामुळे रद्द) शाकिबने दोन शतके आणि तीन अर्धशतके लगावली असून त्याला तीन वेळा सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आले.

First Published on: June 26, 2019 4:36 AM
Exit mobile version