मेरी उपांत्य फेरीत; विक्रमी आठवे पदक पक्के

मेरी उपांत्य फेरीत; विक्रमी आठवे पदक पक्के

सहा वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोमने (५१ किलो) गुरुवारी जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे तिने स्वतःचाच विक्रम मागे टाकत जागतिक स्पर्धेतील तब्बल आठवे पदक निश्चित केले. मागील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी मेरी ही जागतिक महिला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉक्सर आहे.

मेरीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाच्या वेलंसिया व्हिक्टोरियावर ५-० अशी मात केली. मेरीने या सामन्यात खूप हुशारीने आणि चतुराईने खेळ केला. आक्रमक खेळ करून जास्तीतजास्त पंचेस मारण्याचा व्हिक्टोरियाचा प्रयत्न होता. मात्र, मेरीला अडचणीत टाकण्यात तिला अपयश आले. मेरीने आपला अनुभव पणाला लावत व्हिक्टोरियाचा भक्कम बचाव भेदला आणि हा सामना ५-० असा जिंकला. आता तिचा उपांत्य फेरीत दुसर्‍या सीडेड तुर्कीच्या बुसेनाझ साकिरोग्लूशी सामना होईल. युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा आणि युरोपियन खेळांमधील सुवर्णपदक विजेत्या बुसेनाझने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या काय झॉन्गजूचा पराभव केला.

मेरीने याआधी जागतिक स्पर्धेत सहा सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. मात्र, ५१ किलो वजनी गटात पदक मिळवण्याची ही मेरीची पहिलीच वेळ आहे. याआधी या वजनी गटात तिला केवळ उपांत्यपूर्व फेरी गाठता आली होती.

सुवर्णपदक मिळवण्याचा प्रयत्न!

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत किमान कांस्यपदक निश्चित करणार्‍या मेरी कोमचे आता सातव्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. मी उपांत्यपूर्व फेरीतील सामना अगदी सहजपणे जिंकले. मात्र, हा सामना जिंकल्याचा मला आनंद आहे. देशाला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि लोक मला नेहमीप्रमाणे पाठिंबा देत आहेत. आता मी देशासाठी सर्वोच्च पदक मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी सुवर्णपदक मिळवू शकेन अशी आशा आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे, असे मेरी म्हणाली.

मंजूची अव्वल सीडेड किमवर मात

जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा खेळणार्‍या भारताच्या मंजू राणीने (४८ किलो) उपांत्य फेरी गाठत आपले पदक निश्चित केले. तिने उपांत्यपूर्व फेरीत अव्वल सीडेड उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मीचा ४-१ असा पराभव केला. तसेच जमुना बोरोने (५४ किलो) जर्मनीच्या उर्सुला गोटलॉबवर ४-१ असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. कविता चहलला (+८१ किलो) मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

First Published on: October 11, 2019 5:17 AM
Exit mobile version