विनेशला ऑलिम्पिकचे तिकीट

विनेशला ऑलिम्पिकचे तिकीट

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. तसेच या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. ऑलिम्पिक कोटा मिळवणारी विनेश ही पहिली भारतीय कुस्तीपटू आहे. दुसरीकडे पूजा धांडा तिच्या जागतिक स्पर्धेतील पदकापासून एक पाऊल दूर आहे.

जागतिक स्पर्धेत सलग तीन वेळा पदक मिळवण्यात अपयश आल्यानंतर विनेशने अखेर कांस्यपदक मिळवले. तिने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मारिया प्रेवोलाराकी हिच्यावर मात केली. या सामन्याच्या सुरुवातीला मारियाच्या चेहर्‍याला जखम झाल्यामुळे विनेशचा १ गुण कमी करण्यात आला. पुढे विनेशने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, मारियाच्या भक्कम बचावामुळे विश्रांतीला विनेश पिछाडीवर होती.

त्यानंतर मारियाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान तिच्या जखमेवर पुन्हा उपचार करण्यात आले. यानंतर विनेशने मारियाला जमिनीवर टाकत चार गुणांची कमाई केली आणि मारियाला जमिनीवरच ठेवत विनेशने हा सामना जिंकला. विनेश ही भारताच्या सर्वात यशस्वी महिला कुस्तीपटूंपैकी एक आहे. तिने आतापर्यंत राष्ट्रकुल आणि एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.

तसेच ५९ किलो वजनी गटात पूजा धांडाने जपानच्या युझूका इनगाकीवर ११-८ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत तिचा रशियाच्या लिऊबोव्ह ओव्हचारोव्हाने पराभव केला. त्यामुळे आता ती कांस्यपदकाच्या लढतीत खेळेल.

First Published on: September 19, 2019 6:29 AM
Exit mobile version