WTC Final : भारताचा संघ संतुलित, फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल याची गांगुलीला खात्री!

WTC Final : भारताचा संघ संतुलित, फायनलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल याची गांगुलीला खात्री!

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला कसोटी क्रिकेटमधील ‘वर्ल्डकप’ असे संबोधले जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकत साधारण १२ कोटी रुपयांचे रोख बक्षीस आणि अजिंक्यपदाची गदा मिळवण्याचा प्रयत्न असेल. विराट कोहलीचा भारतीय संघ संतुलित असून या संघात मॅचविनर आणि अनुभवी खेळाडूंची भरणा आहे. भारताला सरावाची फारशी संधी मिळालेली नसली तरी अंतिम सामन्यात कोहलीचा संघ सर्वोत्तम खेळ करेल याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीला खात्री आहे.

मागील दोन वर्षांत खूप मेहनत घेतली

आम्हा सर्वांसाठीच हा खूप मोठा क्षण आहे. मी भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देतो. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंतची मजल मारण्यासाठी त्यांनी मागील दोन वर्षांत खूप मेहनत घेतली आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघ सर्वोत्तम खेळ करेल याची मला खात्री आहे. आपला संघ खूप संतुलित आहे. भारताची फलंदाजांची फळी मजबूत आहे. अगदी खालच्या फळीतील फलंदाजही धावा करण्यात सक्षम आहेत, जे आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पाहिले. भारताच्या संघात उत्कृष्ट खेळाडूंची भरणा असून त्यांनी मागील बऱ्याच वर्षांपासून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच या संघाला इतकी मोठी मजल मारता आली आहे, असे गांगुली म्हणाला.

कोहलीचे असेल दमदार कामगिरीचे लक्ष्य

विराट कोहलीला भारताचा कर्णधार म्हणून अजून आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात दमदार कामगिरी करण्याचे कोहलीचे लक्ष्य असेल असे गांगुलीला वाटते. प्रत्येकासाठीच ही एक संधी आहे. कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो या अंतिम सामन्यात अविश्वसनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल याची मला खात्री असल्याचे गांगुलीने सांगितले.

First Published on: June 17, 2021 10:19 PM
Exit mobile version