आयपीएलची तुलना स्थानिक क्रिकेटमधील इतर स्पर्धांशी नकोच; जय शाहांचे टीकाकारांना प्रत्युत्तर

आयपीएलची तुलना स्थानिक क्रिकेटमधील इतर स्पर्धांशी नकोच; जय शाहांचे टीकाकारांना प्रत्युत्तर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या केवळ ६० सामन्यांची तुलना स्थानिक क्रिकेटमधील २ हजारहून अधिक सामन्यांशी करणे योग्य नसल्याचे मत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी व्यक्त केले आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, रणजी करंडक आणि ज्युनियर क्रिकेटचे सर्व सामने बीसीसीआयने रद्द केले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. परंतु, त्याचवेळी बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा युएईमध्ये आयोजित केली आणि त्यामुळे बोर्डाचे आर्थिक नुकसान झाले नाही. बीसीसीआयच्या या निर्णयावर बरीच टीका झाली. परंतु, ही टीका रास्त नसल्याचे मत जय शाहांनी व्यक्त केले.

जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना संधी मिळते

आयपीएलच्या आयोजनावरून आमच्यावर झालेली टीका योग्य नव्हती. २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आम्ही सय्यद मुश्ताक अली करंडक, विजय हजारे करंडक आणि सिनियर महिलांच्या एकदिवसीय स्पर्धा सर्व खबरदारी घेत आयोजित केल्या. आयपीएलची स्थानिक क्रिकेटमधील इतर स्पर्धांशी तुलना करणे योग्य नाही. आयपीएलमध्ये फ्रेंचायझी बऱ्याच गोष्टी ठरवतात. तसेच या स्पर्धेत जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळते, असे शाह म्हणाले.

स्थानिक क्रिकेटचे सामने घेणे शक्य नव्हते

आयपीएलचे केवळ ६० सामने असतात, तर स्थानिक क्रिकेटमध्ये दोन हजारहून अधिक सामने होतात. आयपीएलमध्ये केवळ आठ संघ खेळतात आणि स्थानिक क्रिकेटमध्ये ३८ संघांत चुरस असते. त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती असताना तिथे स्थानिक क्रिकेटचे सामने घेणे शक्य नव्हते, असेही शाह यांनी सांगितले. आयपीएल स्पर्धा सात आठवड्यांत संपते, तर स्थानिक क्रिकेटमधील सर्व स्पर्धा पूर्ण होण्यासाठी साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागतो.

First Published on: July 21, 2021 3:01 PM
Exit mobile version