नगर विकास विभागाने दिले १८३ कोटी, ठाणे मनपाने घातले ‘खड्ड्यात’!

नगर विकास विभागाने दिले १८३ कोटी, ठाणे मनपाने घातले ‘खड्ड्यात’!
ठाणे – पावसामुळे जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे ठाणेकरांचा नियमित प्रवास वाहतूक कोंडीत अडकून होत आहेत. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी १८३ कोटींची मंजुरी देण्यात आली होती. या निधीतून १२७ रस्त्यांची कामे केली जाणार होती. मात्र, तीन महिने उलटूनही यातील एकाही रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नसल्याची माहिती मनसेचे जनहित विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी दिली. विशेष म्हणजेच सदर कामात ठेकेदारास सबकॉन्ट्रॅक्टर देण्यास पात्र असल्यामुळे रस्त्यांचा कामाचा दर्जा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान अवघ्या एक आठवड्यावर येऊ ठेपलेल्या बाप्पाचे स्वागतही ठाणेकरांना या खड्डेमय रस्त्यातूनच करावे लागणार आहे. (183 crore sanction for work of roads in thane but not started yet)
हेही वाचा – पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या प्रवाशांना टीएमटीकडून विनामूल्य प्रवासाचं गिफ्ट
शहरातील रस्त्यांवरून शहराचा विकास समजला जातो. मात्र, स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील रस्त्यांची दुरवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांपेक्षाही यंकर आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाल्यावर ठाण्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात होती, मात्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरही ठाण्याच्या रस्त्यांची दुरवस्था कायम आहे.
ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधी अंतर्गत ठाण्यातील महत्त्वांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि युटीडब्लूटी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. ठाण्यातील १२७ रस्त्यांमध्ये ८४ रस्त्यांचे युटीडब्ल्यूटी, १२ रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट पद्धतीने तर ३४ रस्त्यांचे डांबरीकरणच्या माध्यातून रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. यामध्ये उड्डणपुलावरील रस्त्यांचाही समावेश आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराला जून २०२२ मध्ये आदेशही देण्यात आला आहे. पण यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण काम फक्त दोन ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येणार असून निविदेमध्ये ठेकेदार त्याचे काम दुसऱ्या ठेकेदाराला म्हणजेच सबकॉन्ट्रॅक्टला देण्यास पात्र असल्यामुळे कामाचा दर्जा घसरण्याची दाट शक्यता आहे.
असा केला जाणार आहे खर्च
डांबरीकरणाच्या कामासाठी ७१ कोटी ९४ लाख ८६ हजार ०८४ आणि युटीडब्लुटीसाठी ८१ कोटी २४ लाख ६१ हजार ७६८ आणि सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी ३० कोटी ८० लाख ५६ हजार ४८७ असे १८३ कोटी महापालिकेच्या वतीने रस्त्यांवर खर्च करण्यात येणार आहे.
गेल्या चार महिन्यांपासून ठाणेकरांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. खड्ड्यांमुळे जीव गेल्याच्या घटनाही असताना प्रशासनाला जाग येत नाही. तरी या सर्व रस्त्यांचे काम त्वरीत पूर्ण करून ठाणेकरांना खड्डेमुक्त शहर करावे व तसे न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसेचे जनहित विधी विभाग 
पावसामुळे ही कामे सुरू करण्यात आलेली नाहीत. मात्र पावसाची उघडीप
मिळाल्यानंतर सर्वच कामे एकत्र सुरू होतील.
प्रशांत सोनाग्रा – नगरअभियंता – ठामपा
First Published on: August 24, 2022 5:56 PM
Exit mobile version