‘पुढे दरोडा पडलाय, सोने काढून ठेवा’; मुंब्य्रात तोतया पोलिसांचा सुळसुळाट

‘पुढे दरोडा पडलाय, सोने काढून ठेवा’; मुंब्य्रात तोतया पोलिसांचा सुळसुळाट
ठाणे –  ‘पुढे दरोडा पडलाय, सोने काढून ठेवा,’ असं सांगत पोलीस असल्याची बतावणी केली. तोतया पोलिसांच्या या बतावणीला भुलून दोघांना एकूण पाच लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. शीळ डायघर आणि मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले आहेत. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रुग्णांना मिळणार ‘लेझर’ शस्त्रक्रिया’ उपचार; महिन्याभरात 12 शस्त्रक्रिया यशस्वी
सकाळी ११ वाजता मुंब्रा बायपासवरील मुंब्रादेवी पायथ्याजवळ डोंबिवलीहून ठाणे मानपाडा येथे हरीश कुमार मोर्या हे आपल्या दुचाकीवरून जात होते. तेव्हा दोन जणांनी त्यांना थांबवून पुढे दरोडा पडला असल्याची माहिती दिली. तसेच, आपण पोलीस असून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी काढून कागदात बांधून देण्याची हातचलाखी केली. हातचलाखी करून या दोघांनी तत्काळ तेथून पोबारा केला.
हेही – अनामत रक्कम परत देण्यास नकार, भाडेकरूचा खोली मालकावर हल्ला
दुसरी घटना साडेअकराच्या सुमारास शीळ फाटा चौकात एक 67 वर्षीय वृध्द महिला पवई मुंबई येथे टॅक्सीतून जात असताना घडली. दोन अनोळखी व्यक्तींनी आपण पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून गाडी बाजूला घेत त्यांचे 3 लाख 20 हजाराचे सोन्याचे दागिने काढायला लावले. हे दागिने कागदात गुंडाळून देण्याची हातचलाखी करून दोघेही तिथून पसार झाले. एकाच वेळी दोन्ही घटना घडल्याने अशी फसवणूक करणारी टोळी या परिसरात असल्याचा संशय पोलिसाकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात मुंब्रा व शीळ डायघर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
First Published on: August 23, 2022 5:12 PM
Exit mobile version