मुंब्य्राची झरीन खान सीएच्या आयपीसी परिक्षेत अव्वल

मुंब्रा येथील झरीन बेगम युसूफ खान या तरुणीने सीए (चार्टर्ड अकाउंटट) च्या आयपीसी प्रवेश परिक्षेत संपूर्ण देशात अव्वल क्रमांक मिळविला आहे. त्याबद्दल सुल्ताना वेलफेअर ट्रस्टच्या वतीने झरीन हिचा सत्कार केला. तसेच, तिचा ट्रस्टच्या वतीने दहा हजार रुपयांचा धनादेशही दिला.

झरीन खान ही मुंब्रा येथे राहणारी असून तिचे वडील मॅकेनिक आहेत. अगदीच छोट्या घरात राहून तिने अभ्यास केला आहे. परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता तिने आधी सीपीटी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात ही नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात आलेली आयपीसी परीक्षा 700 पैकी 461 (65.86 टक्के) गुणांसह उत्तीर्ण करुन देशात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे. ठाणे शहरात अशा पद्धतीने देशात अव्वल येण्याचा मान पटकावणारी झरीन ही पहिलीच मुलगी आहे. आता झरीन तीन वर्षांच्या इंटर्नशीप नंतर मुख्य परीक्षा देऊन सीए होणार आहे.

झरीन हिच्या यशाची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी तिच्या घरी जाऊन तिचा तसेच तिच्या मातापित्याचा सत्कार केला. गरीब परिस्थितीमध्येही इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर जरीन हिने हे यश मिळविले असल्याने तिला सुल्ताना वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने तिला 10 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात आले. तसेच, या पुढे शिक्षणासाठी तिला सर्व प्रकारचे साह्य करण्याचे आश्वासनही शानू पठान यांनी दिले. यावेळी शानू पठाण यांनी, झरीन हिने केवळ मुंब्रा-कौसाच नव्हे तर सबंध महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. त्यामुळे तिचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.

झरीन हिने गरीबीवर मात करीत ठाण्याचे नाव देशपातळीवर गौरविले असल्याने ठामपानेही या मुलीचा सत्कार करुन तिला आर्थिक मदत करावी, अशी सूचना आपण प्रशासनाला करणार आहोत, असे सांगितले. झरीन हिच्या सत्कार प्रसंगी बबलू सय्यद, मेहसर शेख, जाहीद इक्बाल यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

First Published on: February 10, 2021 3:29 PM
Exit mobile version