वैद्यकीय शिक्षण विभाग, संचालकांची महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

वैद्यकीय शिक्षण विभाग, संचालकांची महाविद्यालयाच्या जागेची पाहणी

अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासंदर्भात सर्वसमावेशक बाबींचा समावेश करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच दिले आहेत. त्यानंतर आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडून पाहणीही करण्यात आली आहे. लवकरच अंबरनाथमध्ये सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहण्याची चिन्ह दिसत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विधार्थ्याना प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. अंबरनाथ येथे शासकीय जागेवर ठाणे जिल्ह्याकरता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारल्यामुळे या विद्यार्थ्यांना उज्ज्वल शैक्षणिक भविष्य मिळू शकेल.
– डॉ. बालाजी किणीकर, आमदार, अंबरनाथ विधानसभा

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. चंदनवाले यांनी अंबरनाथ पूर्व भागातील सर्वे नं. १६६ या वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्तावित असलेल्या २६ एकर जागेची पाहणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख पुरुषोत्तम उगले, गणेश कोतेकर, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे,.तुळशीराम चौधरी, प्रांत अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार जयराज देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, छाया हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष पाटोळे, तालुका भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती मांढरे, विकास अडांगळे, नगरपरिषदेचे प्रकल्प सल्लागार राजेंद्र हावळ, सहाय्यक नगररचनाकार राजेंद्र हेले आदी उपस्थित होते.बुधवारी (ता.३) वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अंबरनाथ येथे सर्व सुविधांनी सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास देशमुख यांनी हिरवा कंदील दिला असून वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक बाबींचा समावेश करून प्रस्ताव तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश देखील दिले होते.

राज्य सरकारने जनतेच्या आरोग्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. शासनाच्या धोरणाप्रमाणे ठाणे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता आवश्यक जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वैद्यकीय महाविद्याल स्थापन करण्यात आले नाही. सद्याच्या परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि लगतच्या भागातील सामान्य जनतेला तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकेल असे सुसज्ज रुग्णालय नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती मध्ये मुंबई येथील के.इ.एम. अथवा जे. जे. रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते. याकारणाने या भागातील सर्व सामान्य नागरिकांची व वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांची मुंबई सारखे सर्व सोयी – सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी सातत्याने मागणी होत असल्याने आमदार डॉ. किणीकर यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे.

हेही वाचा –

अजोय मेहतांचा मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार पदाचा राजीनामा

First Published on: February 11, 2021 7:26 PM
Exit mobile version